esakal | एकाच्या नावाने नोंदणी केलेली लस टोचून घेतली दुसऱ्यानेच ! सोलापुरातील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

कोविशिल्ड लस

एकाच्या नावाने नोंदणी केलेली लस टोचून घेतली दुसऱ्यानेच ! सोलापुरातील धक्कादायक घटना

sakal_logo
By
वेणुगोपाळ गाडी

सोलापूर : एका महिलेने कोरोना लसीकरणासाठी (Covid Vaccination) ऑनलाइन नोंदणी केली होती, मात्र आजारी असल्याने त्या नियोजित तारखेला लस घेऊ शकल्या नाहीत. याचा गैरफायदा घेत त्यांच्या नावे दुसऱ्यानेच लस घेतल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस मुख्यालय लसीकरण केंद्रात घडला आहे. (The vaccine registered in one's name was injected by the other)

ही महिला सोलापुरातील अशोक चौक भागातील सत्तर फूट रोड परिसरात राहते. या महिलेने कोव्हिड लस घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. यानुसार ठरलेल्या तारखेवर त्या लस घेऊ शकल्या नाहीत. कारण त्यांचा शुगर वाढला होता. याचा गैरफायदा घेत या महिलेच्या नावाने असलेली लस दुसऱ्याच व्यक्तीने घेतली. या व्यक्तीने लस घेतल्यानंतर या महिलेला लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोमवारी (ता. 3) त्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात आले. त्यामध्ये पोलिस मुख्यालय लसीकरण केंद्रात हे लसीकरण झाल्याचा उल्लेख आहे.

हेही वाचा: रेमडेसिव्हिरचा काळाबाजार ! अकलूजमध्ये पोलिसांनी केले तिघांना जेरबंद

या प्रकाराने ही महिला अचंबित झाली असून, याबाबत त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाइकांना ही बाब कळविली. यावर त्यांच्या नातेवाइकांनी यासंदर्भात मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे ई- मेलवर तक्रार केली आहे. यावर लगेच हे प्रकरण संबंधित विभागाकडे पाठविणार, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आले आहे. एकंदर, कोरोनासंदर्भात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर या इंजेक्‍शनचा काळाबाजार होत आहे. याबाबत अनेक घटना घडत आहेत. आता लसीबाबतही अशा घटना घडत आहेत.

एखाद्या व्यक्तीने नियोजित तारखेला लस घेतली नाही तर त्याच्या नावे दुसऱ्याच व्यक्ती लस घेत आहेत. असे प्रकार शहरातील अन्य लसीकरण केंद्रांत होत असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर नियंत्रण ठेवावे. वेळोवेळी त्याचे ऑडिटदेखील व्हावे, अशी मागणी होत आहे.

माझ्या नातेवाइकाच्या नावाने दुसऱ्याच व्यक्तीने लस घेतली आहे. याबाबत मी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, उलट टपाली आलेल्या उत्तरात हे प्रकरण संबंधित विभागाकडे पाठविणार, असे नमूद आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

- प्रसाद पल्ली, महिलेचे नातेवाईक