esakal | शासन म्हणते लस घ्या, पण लस उपलब्ध करत नाही ! कथनी अन्‌ करनीमध्ये विरोधाभास

बोलून बातमी शोधा

Vaccine

"नागरिकांनो, लस घ्या...' असे सतत आवाहन करणाऱ्या शासनाकडूनच लस उपलब्ध न झाल्याने कुर्डुवाडीसह माढा तालुक्‍यातील काही लसीकरण केंद्रांवरील लसीकरण थांबले आहे. शासकीय आरोग्य विभागाच्या आवाहनात व कृतीत विरोधाभास दिसून येत आहे. 

शासन म्हणते लस घ्या, पण लस उपलब्ध करत नाही ! कथनी अन्‌ करनीमध्ये विरोधाभास
sakal_logo
By
विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : "नागरिकांनो, लस घ्या...' असे सतत आवाहन करणाऱ्या शासनाकडूनच लस उपलब्ध न झाल्याने कुर्डुवाडीसह माढा तालुक्‍यातील काही लसीकरण केंद्रांवरील लसीकरण थांबले आहे. शासकीय आरोग्य विभागाच्या आवाहनात व कृतीत विरोधाभास दिसून येत आहे. मात्र यात सामान्य नागरिकाला लस घेण्यासाठी विलंब होत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद असूनही लस उपलब्ध नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रांवर नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. 

पहिला डोस व दुसरा डोस यातील कालावधी नवीन मार्गदर्शनानुसार वाढला आहे. पण पहिला डोस घेण्यासाठीच विलंब होत आहे, त्यामुळे दुसऱ्या डोसलासुद्धा तेवढाच विलंब होणार आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक नागरिक स्वतःहून लस घेण्यासाठी येत आहेत. सध्या 45 वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या नागरिकांना लस देणे सुरू आहे. परंतु 45 वर्षे वय कमी असलेल्या अनेक तरुणांमधून लस देण्याची मागणी होत आहे. 

माढा तालुक्‍यात 10 केंद्रांमध्ये लसीकरण सुरू होते. जिल्हा आरोग्य विभागाकडून तालुक्‍याला पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. सोमवारी लस संपल्यामुळे मंगळवारी यापैकी अनेक केंद्रांवर लस देण्यात आली नाही. बुधवारी रोपळे, मानेगाव व परिते या तीनच ठिकाणी लस देण्यात आली असल्याचे समजते. इतर लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परतावे लागले. 


लसीचे दोन हजार डोस उपलब्ध झाले आहेत. गुरुवारपासून तालुक्‍यातील सर्व लसीकरण केंद्रांवर सुरळीतपणे लसीकरण सुरू होईल. याशिवाय ज्या ग्रामपंचायती स्वयंस्फूर्तीने नागरिकांची नोंदणी करून लसीकरण केंद्राची मागणी करत आहेत तिथे आम्ही लसीकरण सुरू करत आहोत. 
- डॉ शिवाजी थोरात, 
माढा तालुका वैद्यकीय अधिकारी 

माढा तालुका 7 एप्रिलपर्यंत दृष्टिक्षेपात 

  • सध्याची लसीकरण केंद्रे : माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, टेंभुर्णी, पिंपळनेर, उपळाई (बु), परिते, आलेगाव, मानेगाव, रोपळे (क). 
  • लसीकरणाचा पहिला डोस घेतलेले नागरिक : 11 हजार 884 
  • लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेले नागरिक : 1 हजार 542 

संपादन : श्रीनिवास दुध्याल