लोकसभेसाठी काँग्रेससमोर आमदार प्रणिती शिंदे याच आश्वासक चेहरा

आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास त्यानिमित्ताने त्यांच्या माध्यमातून अक्कलकोट, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा आणि सोलापूर दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ मिळू शकते.
प्रणिती शिंदे
प्रणिती शिंदेesakal

सोलापूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा एकच आमदार (प्रणिती शिंदे) आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसची आवस्था दयनिय झाली आहे. पक्षवाढीसाठी दुसरा तेवढा तगडा नेता अद्याप मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांना खासदारकीची उमेदवारी दिल्यास त्यानिमित्ताने त्यांच्या माध्यमातून अक्कलकोट, शहर उत्तर, शहर मध्य, मोहोळ, पंढरपूर-मंगळवेढा आणि सोलापूर दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ मिळू शकते. ग्रामीणमध्ये अजूनही त्यांची क्रेझ असून त्यांचे समाजकारण लोकांना ज्ञात आहे. भाजपच्या उमेदवाराला त्याच टक्कर देऊ शकतात, असा एक मतप्रवाह पक्षात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर पक्षसंघटन मजबूत करण्याची मोठी संधी काँग्रेस नेत्यांना होती. पण, जिल्ह्यात तसा प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. वर्षानुवर्षे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या प्रकाश पाटील यांना काढून त्यांच्या ठिकाणी डॉ. धवलसिंह मोहिते-पाटलांना संधी मिळाली. पण, जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढीसाठी राज्याच्या नेत्यांनी विशेषत: मंत्र्यांनी वेळ द्यावा, अशी सातत्याने मागणी करूनही त्यांचे मत वरिष्ठ नेत्यांनी मनावर घेतले नाही. खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, एका मंत्र्याला काही जिल्ह्यांची जबाबदारी देऊन पक्षसंघटन वाढविण्याचा प्रयत्न होईल. पण, तसेही काही झाले नाही. अनेक नाराज कार्यकर्ते, पदाधिकारी दुसऱ्या पक्षात विशेषत: राष्ट्रवादीत गेले. आमदार प्रणिती शिंदे यांना पक्षाने राज्याचे कार्याध्यक्ष केले, राज्याच्या सत्तेत काँग्रेस आहे, अनुसूचित जाती-जमाती समितीच्या त्या प्रमुख आहेत. अशावेळी त्यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या बळकीटकरणासाठी लक्ष द्यायला हवे होते. पण, त्यांनी लक्ष न दिल्याने अनेक गावांमधून काँग्रेस हद्दपार तथा नावालाच उरल्याचे चित्र आहे. आगामी काळात मुख्यमंत्री आमचाच म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढून पक्ष संघटन उभे करावे लागणार आहे, हे निश्चित.

‘शहर मध्य’मधून मुस्लिम उमेदवार


आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून अनेक मातब्बर नेत्यांना धुळ चारत विजयाची हॅट्रिक साधली. पण, सुरवातीला मिळालेले मताधिक्य आणि २०१९ च्या निवडणुकीत मिळाले नाही. आता आमदार प्रणिती शिंदे या लोकसभेच्या उमेदवार राहिल्यास शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम पदाधिकाऱ्यालाच संधी द्यावी लागणार आहे. त्याठिकाणी ‘एमआयएम’चे मोठे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून पुढचा उमेदवार कोण, याचा तर्कवितर्क लावला जात आहे.

सहकार अन्‌ झेडपी, पंचायतीत नाही ताकद


माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, ॲड. यु. एन. बेरिया, नलिनी चंदेले यांच्या शैक्षणिक, सामाजिक संस्था आहेत. माजी आमदार माने यांच्याकडे कारखाना पण आहे. या संस्थांच्या मदतीने त्यांनी काँग्रेसमध्ये राहून काम केले आणि पदे मिळविली. पण, राजकारणातून समाजकारण करणाऱ्या माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वत:साठी तशा संस्थांची उभारणी केली नाही. आमदार प्रणिती शिंदेंनीही समाजकारणाकडेच जास्त लक्ष दिले. पण, मागे वळून पाहताना अनेकांनी त्यांची साथ सोडली. राष्ट्रवादी, भाजपच्या तुलनेत जिल्ह्यातील पंचायत समित्या, नगरपालिका, जिल्हा परिषद व जिल्हा बॅंकेत काँग्रेसला म्हणावे तितके यश मिळाले नाही. आता त्यांना राजकीय अस्तित्वासाठी नव्याने पाठबळ उभे करावे लागणार आहे. त्यासाठी आमदार प्रणिती यांना कार्यकर्ता, पदाधिकारी, सर्वसामान्यांचे कॉल उचलून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतील. त्यांच्यासाठी वेळ द्यावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com