
भाजप आमदारावर शाई फेकण्याचा प्रयत्न! शर्ट बदलून विवाह सोहळ्याला हजेरी
सोलापूर : येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात मंगळवारी (ता. १३) भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. साध्या वेशातील पोलिसांनी त्या तरूणाला अडवल्याने त्यांच्या अंगावर शाई गेली नाही, असा दावा जोडभावी पेठ पोलिसांनी केला आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड येथे मंत्री पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली. त्यानंतर काही पोलिसांना निलंबित करण्यात आले, तर शाई फेकणाऱ्याविरूध्द कडक कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी आंदोलने झाली. मंगळवारी भाजप आमदार विजयकुमार देशमुख हे सम्राट चौकातील न्यू बुधवार पेठेतील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी गेले होते. त्याठिकाणी भीम आर्मी संघटनेच्या एका कार्यकर्त्याने आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांना पूर्वकल्पना असल्याने जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत हे स्वत: त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या सोबतीला विवाह सोहळ्याच्या ठिकाणी साध्या वेशात दहा पोलिस कर्मचारी नेमले होते. त्यांनी त्या तरूणाला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले होते.
आमदार देशमुखांनी शर्ट बदलला?
विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार विजयकुमार देशमुख दाखल झाले. मंडपात आगमन होताच वऱ्हाडी म्हणून शाई घेऊन तेथे बसलेला तरूण उठला. हातातील शाई आमदार देशमुखांच्या दिशेने फेकली. आता ती शाई त्यांच्या अंगावर पडली की नाही, यावर तर्कवितर्क सुरु झाले आहेत. त्यांच्या अंगावर शाई फेकण्यापूर्वीच तरूणाला ताब्यात घेतल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात, आमदार देशमुख यांच्या शर्टवर थोडी शाई गेल्याने त्यांनी लगेच शर्ट बदलून लग्न सोहळ्याला हजेरी लावली.