Solapur "छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शून्यातून विश्व निर्माण करा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. नितीन बानगुडे - पाटील

Solapur "छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शून्यातून विश्व निर्माण करा"

दत्तात्रय खंडागळे

सांगोला- छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक आज प्रत्येक तरुणांनी बाळगली पाहिजे. मनाची जिद्द बाळगा, कष्टाची तयारी ठेवा यश तुमच्या पायाशी लोळन घेतल्याशिवाय राहणार नाही असे मत इतिहासाचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

खर्डी (ता. पंढरपूर) येथे एल के पी मल्टीस्टेटच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रा. नितीन बानगुडे - पाटील बोलत होते. बानुगडे-पाटील पुढे म्हणाले की, 'मित्रांनी एकत्रित येत सूर्योदय नावांनी विविध उद्योगांची उभारणी केला आहे.

त्यांनी उद्योगांचे जाळे व मोठ्या प्रमाणावर केलेली रोजगार निर्मिती या गोष्टींचा आदर्श प्रत्येक मराठी उद्योजकांनी घ्यायला हवा. तसेच या उद्योग समूहाद्वारे एलकेपी मल्टीस्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन राज्यांमध्ये अनेक शाखांच्या माध्यमातून घेत असलेली भरारी ही कौतुकास्पद आहे. आज मला परिस्थिती प्रतिकूल आहे,

परिस्थिती अनुकूल होईल मग मी काहीतरी करेन असे हताश होऊन वाट पाहत न बसता छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन जशी असेल तशा परिस्थितीमध्ये व उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक आज प्रत्येक तरुणांनी बाळगली पाहिजे. पेरणी न करता फळांची अपेक्षा करणाऱ्या पिढीला मी सांगू इच्छितो, आधी सुरुवात करा मनाची जिद्द बाळगा, कष्टाची तयारी ठेवा यश तुमच्या पायाशी लोळन घेतल्याशिवाय राहणार नाही.

मित्रांनी एकत्रित येत सूर्योदय नावाने विविध उद्योगांची केलेली उभारणी कौतुकास्पद आहे.' या कार्यक्रमास सरपंच मनिषा सव्वाशे, जयसिंग पाटील, एलकेपी मल्टीस्टेटचे अध्यक्ष अनिल इंगवले, उपाध्यक्ष सुभाष दिघे, संचालक जगन्नाथ भगत, संचालक डॉ. बंडोपंत लवटे, अरविंद केदार, संभाजी पाटील व पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अनिल इंगवले यांनी प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खर्डी शाखेचे शाखा व्यवस्थापक सतीश बहिरे, रोंगे कोळी इत्यादींनी परिश्रम घेतले.