किल्ला संगोपनाचा 'नळदुर्ग पॅटर्न' राज्यभरासाठी आदर्श

किल्ला संगोपनाचा "नळदुर्ग पॅटर्न' राज्यभरासाठी आदर्श
नळदुर्ग गड
नळदुर्ग गडsakal

सोलापूर : गेल्या आठवड्यात राजस्थानच्या जैसलमेर, पोकरण, जयपूर अन्‌ जोधपूर अशी कौटुंबिक सहल केली. राजस्थानातील शहरे, किल्ले, तलाव पाहून मन भरुन आले. तब्बल दोन-अडीच वर्षांनी केलेल्या पर्यटनामुळे समाधान तर वाटलेच. पण या दौऱ्यातून एक लक्षात आले, की राजस्थानपेक्षा महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची समृद्धी व श्रीमंती कैकपटीने अधिक आहे. पण केवळ संवर्धन व देखभालीअभावी ते दुर्लक्षित असल्याची खंत वाटली. राजस्थानातील स्वच्छता, देखभाल व संवर्धनामुळे पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे. तेथील प्रत्येक ठिकाणी मोजावे लागणाऱ्या तिकिटरुपी पैसे दिल्याबद्दल कसलीही खंत वाटली नाही. तर मग आपण महाराष्ट्रात का अशी पद्धती अवलंबत नाही, याबद्दल खेद वाटला. एका अक्कलकोटच्या (जि. सोलापूर) संस्थानकालिन शस्त्रागाराच्या दहा टक्केही शस्त्रे राजस्थानात नसल्याचे जाणवले. सध्या नळदुर्गच्या किल्ल्याचे संवर्धन खूपच चांगल्या पद्धतीने सुरु आहे. तो "पॅटर्न' राज्यभर वापरला तर पर्यटनात वाढ होऊन रोजगाराची मोठी उपलब्धी होईल.

नळदुर्ग गड
Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या ताकदीवर राष्ट्र निर्माण केले. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात भरच टाकली. महाराष्ट्राच्या इतिहासाला स्वकर्तृत्वाची झालर आहे. तब्बल 255 भूईकोट किल्ले या राज्यात असून त्याची महतीही मोठी आहे. राज्यभरातील केवळ रायगडावर सध्या संवर्धनाच्या दृष्टीने उत्खननाचे काम सुरु आहे. रायगड विकास प्राधीकरण व भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीने ही मोहीम सुरु आहे. पण त्याच्या गतीबाबत प्राधीकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे चिंतीत आहेत. आपल्या पिढीला विकसीत रायगड पाहण्याचे भाग्य लाभेल की नाही, असे त्यांना वाटत आहे. रायगडच्या उत्खननाची गती वाढविण्याची गरज त्यांनी प्रतिपादली आहे.

नळदुर्ग गड
Pune-Mumbai Express: आरक्षित गाड्यांसाठी सीझन पास नाहीच

किल्ला संवर्धनासाठी प्रतिसाद शून्य

2014 मध्ये तत्कालिन आघाडी सरकारने पर्यटनवृद्धी व ऐतिहासिक वास्तूंच्या संगोपनासाठी "महाराष्ट्र वैभव संगोपन दत्तक योजना' हा उपक्रम दहा वर्षांच्या अटीवर प्रायोगिक तत्वावर सुरु केला. यासाठी खासगी, सामाजिक संस्था, उद्योजक, व्यावसायिक, बिल्डर्स व तत्सम संस्थांना आवाहन केले. केवळ नळदुर्ग येथील किल्ल्याच्या संगोपन व देखभालीचे काम सोलापूरच्या युनिटी मल्टीकॉनला मिळाले. अन्य किल्ल्यांसाठी प्रतिसाद शून्यच होता. अपवाद वगळता महाराष्ट्रातील सर्वच किल्ल्यात अवैध व्यवसाय, अतिक्रमणे अन्‌ गावगुंडांच्या साम्राज्याचे दुर्दैवी चित्र दिसते. नळदुर्ग किल्ल्याचे रुपडे पालटण्यासाठी युनिटी मल्टीकॉनला जीवाचे रान करावे लागले. सात कोटींवर खर्च करून पुरातत्व खात्याच्या सहकार्याने वास्तूला धक्का न लावता किल्ल्यात प्रचंड बदल केले. किल्ल्यानजिकच्या बोरी नदीतून गाळ काढून लॅंडस्केपिंग, वाहनतळ, रस्ता, बागकाम या सुविधांची निर्मिती करताना किल्ल्याच्या भिंतीवरील प्रेमिकांचे संदेश अक्षरशः पाण्याने धुवावे लागले. कोणत्याही यंत्रणेच्या सहकार्याविना किल्ला देखणा केला. तरीही गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे किल्ला बंदच ठेवावा लागला होता. आता तो सुरु झाला आहे. अगदी नाममात्र शुल्कात हा किल्ला पहावयास मिळतो.

नळदुर्ग गड
Russia Ukraine War: युक्रेनचं 'भूत' बनलं रशियाचा काळ; अनेक लढाऊ विमानं पाडली

नळदुर्ग किल्ल्याची महती

मुंबई-हैदराबाद महामार्गावर वसलेल्या नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे तब्बल 104 एकर 16 गुंठे जागेवर मध्ययुगीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या किल्ल्याची अत्यंत दयनीय स्थिती झाली होती. तब्बल अडीच किलोमीटरचा घेरा असलेला हा किल्ला चालुक्‍य काळात बांधला गेल्याचे सांगितले जाते. त्या काळात मातीचा असलेल्या किल्ल्याची 1351-80 मध्ये बहामनी राजाच्या काळात पुनर्बांधणी झाली. तीनही बाजूने पाण्याचे वेढलेल्या या किल्ल्याच्या चारही बाजूने डोंगर आहे. समुद्रसपाटीपासून 22 फूट उंचीवर हा किल्ला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा मिश्र किल्ला म्हणूनही याची नोंद आहे. 1481 मध्ये विजापूरच्या अदिलशहाने हा किल्ला जिंकला. 1558 मध्ये या किल्ल्यास दगडी चिरांची मजबूत तटबंदी करण्यात आली. या किल्ल्याला 114 बुरुजे असून त्यातील उपली बुरुज सर्वात मोठा आहे. नऊ, तुर्चा, संग्राम, फतेह, परंडा, पुणे बुरुज अशी अन्य बुरुजे आहेत. येथील पाणीमहालाचे आकर्षण व दरवर्षी पावसाळ्यात नर-मादी रुपाने वाहणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते.

पुनर्निर्माणाची गरज

खासगी, सामाजिक संस्था, शासकीय कंत्राटदार, बिल्डर्सना आवाहन करुन राज्यातील इतर किल्ल्यांसाठी शासनास पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागणार आहेत. हजारो कोटींचे कंत्राट घेणाऱ्यांना तसेच काही संस्थांना पुढे आणावे लागेल, यातून या किल्ल्यांचे संगोपन, संवर्धन होईल. तसेच पुढील हानीही टळेल. गड-किल्ल्यांचा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढीसाठी जतन तर करता येईलच. त्याचबरोबर पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होईल. मुंबई, पुण्याजवळील किल्ल्यांचे एक वेगळे महसुली उत्पन्नाचे मॉडेल तयार होईल. त्यासाठी वास्तू तज्ज्ञांकडून जुन्या किल्ल्याचे रायगड पॅटर्ननुसार पुनर्निर्माण गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com