बाराशे रुपये अन्‌ तरूणाला आवडलेल्या मोबाईलवरून मुलाचा खून! आरोपीला जन्मठेप

आरोपी आणि खून झालेला अमीर यांच्यातील बाराशे रुपयांचा व्यवहार आणि आरोपीला आवडलेला अमीरचा मोबाइल, यातून अरबाज अयुब शेख (वय १९, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) याने अमीर अल्ताफ मुजावर या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला.
crime
crimesakal

सोलापूर : आरोपी आणि खून झालेला अमीर यांच्यातील बाराशे रुपयांचा व्यवहार आणि आरोपीला आवडलेला अमीरचा मोबाइल, यातून अरबाज अयुब शेख (वय १९, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) याने अमीर अल्ताफ मुजावर या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आरोपी अरबाजला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील अरबाज व अमीर दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. अरबाजने अमीरला बाराशे रुपये दिले होते. पैसे मागूनही तो देत नव्हता, पण अमीरकडील एक मोबाइल अरबाजला खूप आवडला होता. ११ जानेवारी २०२० रोजी अरबाजने गावातील राज बियर शॉपीमधून दोन बियर विकत घेतल्या. जवळील एका शाळेमागे दोघेही गेले आणि त्याठिकाणी अरबाजने अमीरला दारू पाजली. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर चिडलेल्या अरबाजने अमीरला नान्नज-मार्डी रोडवरील प्रशांत बिचडू यांच्या शेतात नेले. त्याठिकाणी रुमालाने गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर अरबाजने अमीरकडील दोन्ही मोबाइल घरी आणले. जो मोबाइल त्याला आवडत होता, तो घरातच लपवून ठेवला. दुसरा मोबाइल अरबाजच्या वडिलांनी अमीरच्या वडिलांना दिला. त्यानंतर अरबाजबद्दल संशय बळावला आणि सोलापूर तालुका पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस तपासात त्याने अमीरचा खून केल्याची कबुली दिली. तत्कालीन पोलिस निरीक्षक सुहास जगताप व अनिल देवडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांचा युक्तीवाद व साक्ष, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी अरबाजला जन्मठेप व दोन हजारांचा दंड, अशी शिक्षा ठोठावली. तसेच अल्पवयीन मुलाला संमतीविना पळवून नेल्याप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. त्याचवेळी मयताच्या नातेवाईकांना भरपाई म्हणून ५० हजार रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले. कोर्टपैरवी म्हणून सुमन वाडे यांनी काम पाहिले. आरोपीतर्फे ॲड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले.

मयत ‘अमीर’ होता पर्यटकांचा गाईड

आठवीत शिक्षण घेत असलेला अमीर अल्ताफ मुजावर (वय १४) हा शाळेत खूप हुशार होता. माळढोक अभयारण्यात पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या देशी-परदेशी पर्यटकांना तो गाईड म्हणून काम करत होता. अनेक पर्यटक अभयारण्य पहायला येण्यापूर्वी अमीरला संपर्क करायचे. त्यामुळे अमीर हा दोन मोबाइल वापरत होता.

एक साक्षीदार ऐनवेळी फुटला, तरीपण...

खुनाचा तपास करून आरोपीला कडक शिक्षा व्हावी, यादृष्टीने सरकार पक्षातर्फे १९ साक्षीदार तपासले. पण, ऐनवेळी राज बियर शॉपीशी संबंधित एक महत्त्वाचा साक्षीदार पलटला. तरीपण, मयताचा वडील फिर्यादी अल्ताफ नबीसाब मुजावर व त्यांची पत्नी आणि शुभम विटकर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच शवविच्छेदन अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल, घटनास्थळावरील भौतिक पुरावे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद, आरोपीला जन्मठेप होण्यासाठी महत्वाचा ठरला. जिल्हा सरकारी वकिल प्रदिपसिंग राजपूत यांच्या कार्यकाळातील ही नव्वदावी जन्मठेप ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com