कांद्याचे निवेदन घेऊन पालकमंत्र्यांकडे आलेल्या जनहित शेतकरी संघटनेच्या देशमुखांना दोन दिवसांची पोलिस कोठडी

कांद्याचे दर गडगडल्याबद्दल निवेदन द्यायला आलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर भैय्या देशमुखांनी त्याठिकाणी गोंधळ घालून पालकमंत्री विखे पाटलांविरूद्ध घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की झाली, त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मनगटाला सूज आली.
prabhakar deshmukh
prabhakar deshmukhsakal

सोलापूर : कांद्याचे दर गडगडल्याबद्दल निवेदन द्यायला आलेल्या जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर भैय्या देशमुखांनी त्याठिकाणी गोंधळ घालून पालकमंत्री विखे पाटलांविरूद्ध घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांना धक्काबुक्की झाली, त्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मनगटाला सूज आली. तसेच देशमुखांचे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. त्यावरून न्यायालयाने देशमुखांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली.

शेतकऱ्यांना कांदा कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. ‘नाफेड’द्वारे खरेदी सुरु करावी, शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल अनुदान द्यावे अशा मागण्यांचे निवेदन घेऊन जनहित शेतकरी संघटनेचे देशमुख हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या भेटीला शनिवारी (ता. ४) नियोजन भवनात आले होते. निवेदन घेतल्यानंतर पालकमंत्री तसेच पुढे निघून गेले. त्यावेळी भैय्या देशमुखांनी मस्तीखोर पालकमंत्री, पालकमंत्र्यांचा निषेध असो, अशी घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांना धक्काबुकी झाली आणि सदर बझार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मनगटाला दुखापत झाली.

त्यानंतर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी भैय्या देशमुखांसह किशोर सुखदेव दत्तु, ज्ञानेश्वर शिवाजी पवार, अंकुश भिमराव वाघमारे, बजरंग कृष्णा शेंडेकर, मोहन सुदाम दत्तु, सोमनाथ रमेश लिगाडे यांच्याविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्या सर्वांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात जाण्यापूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी हाताच्या मनगटाचा एक्स-रे काढला होता.

तत्पूर्वी, पालकमंत्र्यांना भेटायला आलेल्या आंदोलकांकडे शाई देखील आढळली. कांद्याच्या माळा होत्या. पालकमंत्र्यांना भेटण्यापूर्वी भैय्या देशमुख हे सोशल मिडियावर दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनासंदर्भात बोलले होते. त्यामुळे त्यांनी पूर्वनियोजित आंदोलन केल्याचे पोलिसांच्या वतीने सरकार पक्षाने न्यायालयास सांगितले. तो व्हिडिओ हस्तगत करून त्यात कोण-कोण होते, याची पडताळणी करून त्या लोकांनाही ताब्यात घेण्यासाठी पोलिस कोठडी मागितली. न्यायालयाने आंदोलकांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. मंगळवारी (ता. ७) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com