
Accident News : मोहोळ तालुक्यातील दोन अपघातात दोघांचा मृत्यू; चार जखमी
मोहोळ : तालुक्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण जखमी झाले. या संदर्भात मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, पहिला अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिखली फाट्याजवळ झाला.
मंगळवार ता 9 रोजी रात्री साडेअकरा वाजता बल्कर क्र एम एच 12/ एस एक्स 8327 मध्ये महादेव दिगंबर गायकवाड वय 22, बापू सूर्यभान मस्के वय 32, मरीबा उर्फ पप्पू भागवत मते वय 32 हे सर्वजण बल्कर मध्ये बसून हिवरे गावा कडुन चिखली कडे निघाले होते.
तो बल्कर चिखली गावाकडे वळताना सोलापूरहून पुण्याकडे भरधाव जाणाऱ्या ट्रेलर क्रमांक आर जे 32/ जीडी 398 याने जोराची धडक दिल्याने त्यात महादेव दिगंबर गायकवाड हा केबीन मधून उडून ट्रेलरच्या टायर खाली अडकला. तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला.
तर बापू सूर्यभान मस्के व मरीबा भागवत मते हे व अन्य एक इसम जखमी झाले. त्यांना क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले व सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या घटनेची फिर्याद बापू हरिदास गायकवाड रा चिखली यांनी मोहोळ पोलिसात दिली आहे.
दुसरा अपघात सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील यावली शिवारात बुधवार ता 10 रोजी सकाळी आठ वाजता झाला. पोलिसा कडून मिळालेल्या माहिती नुसार, अभिमान आगतराव चेंडगे वय 68 व सुनील सौदागर जाधव वय 45 हे दोघे मोटरसायकल क्र एम एच13/ सीए 4208 वरून या यावली कडे जाताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या कार क्र एम एच 02/ एजी 3293 हिने पाठीमागून जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
अभिमान चेंडगे यांना उपचारासाठी तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारा पूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर सुनील जाधव हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी श्रीराम माणिक चेंडगे वय 37 रा यावली यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून, कार चालक शौकत इसाक शेख रा हवेली याचे विरुद्ध मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योतिबा पवार हे करीत आहेत.