
१५ मेपर्यंत सुरुच राहणार उजनीचे पाणी! मेच्या पहिल्याच आठवड्यात धरण तळ गाठणार
सोलापूर : कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात सोडलेले उजनी धरणातील पाणी १५ मेपर्यंत सुरुच राहणार आहे. कॅनॉल, बोगदा, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून शेतीसाठी पाणी सोडले आहे. आता सीना नदी काठावरील लाइट बंद करण्यात आली असून नदीतूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी तळ गाठणार आहे.
सोलापूर शहरासाठी नुकतेच भीमा नदीतून पाणी सोडण्यात आले होते. औज बंधाऱ्यात ते पाणी पोचल्याने भीमा नदीत सोडलेले पाणी आता बंद करण्याात आले आहे. सीना नदीतून आता शेती व जनावरांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यातून वडकबाळ, सिंदखेड, कोर्सेगाव व बंदलगी, हे बंधारे भरून घेतले जाणार आहेत. तत्पूर्वी, २० बंधारे भरून घेण्यात आले आहेत. कॅनॉलद्वारे ‘टेल टू एण्ड’पर्यंत पाणी सोडले जात आहे.
आता नंदुरपर्यंत पाणी पोचले आहे. दरम्यान, सोलापूर शहरासाठी मे महिन्यात भीमा नदीतून आणखी एक रोटेशन सोडले जाणार आहे. त्यावेळी सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. तर दुसरीकडे १० ते १५ मेपर्यंत कॅनॉल व बोगद्यातूनही पाणी सुरु राहणार आहे. कॅनॉलमधून एक रोटेशन सोडण्यासाठी किमान सात टीएमसी पाणी लागते. या सर्व बाबींचा विचार करता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात उजनी धरण मायनसमध्ये जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
ठळक बाबी...
- धरणात सध्या एकूण पाणीसाठा ८० टीएमसी आहे.
- उजनीत जिवंत साठा १५.६३ टीएमसीपर्यंत आहे.
- सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचनमधून ४३३ क्युसेक पाणी सोडले जात आहे.
- बोगद्यातून ८८० क्युसेक तर कॅनॉलमधून तीन हजार क्युसेकने पाणी सुरु आहे.
आंदोलन नको; चार बंधारे भरले जातील
सीना नदी व कुरूल कॅनॉलमध्ये पाणी नसल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सीना नदी आणि कुरुल कॅनॉलमध्ये टेल टू एण्डपर्यंत पाणी सोडावे, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्याकडे केली आहे. या मागणीसाठी उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता गुरुनानक चौकातील सिंचन भवन येथे आंदोलन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण, तीन-चार दिवसांत सीना नदी व कुरुल कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याचे नियोजित असून आंदोलन करू नये, अशी विनंती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने आमदार देशमुख यांच्याकडे केली आहे.