
विद्यापीठाची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ! १४ जुलैपासून परीक्षा, ५० गुणांसाठी एक तासाचा वेळ
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तिसऱ्यांदा परीक्षा वेळापत्रकात बदल केला आहे. आता १४ जुलैपासून परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा ऑफलाइन पध्दतीनेच होणार आहेत, परंतु वर्णनात्मक प्रश्नांऐवजी सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ असतील. सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनेने आज त्यासंदर्भात विद्यापीठासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर विद्यापीठाला हा निर्णय घ्यावा लागला.
हेही वाचा: तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती
कोरोना काळात सलग दोन वर्ष विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइन पार पडल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव कमी झाला. आता विद्यापीठाने वर्णनात्मक प्रश्नांची परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे गुण कमी होतील, अशी भीती वर्तविण्यात आली. दयानंद महाविद्यालयाच्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असावी, अशी मागणी केली होती. दुसरीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनीही त्यासंदर्भात विद्यापीठाला निवेदन दिले होते. तरीही, विद्यापीठ प्रशासनाने त्याची दखल न घेता परीक्षा पूर्वीप्रमाणेच वर्णनात्मक प्रश्नांद्वारे घेण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांची गुणवत्ता किंवा नोकरी तथा पुढील शिक्षणासाठी ते बाहेर गेल्यानंतर इतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपले विद्यार्थी मागे राहू नयेत, असा त्यामागील हेतू होता. पण, शनिवारी (ता. १८) सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी शेकडो विद्यार्थ्यांसोबत विद्यापीठासमोर ठिय्या आंदोलन करीत निदर्शने केली. त्यानंतर विद्यापीठाने तातडीने निर्णय बदलला आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या. यावेळी प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी, काँग्रसेचे युवक शहराध्यक्ष गणेश डोंगरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा: १८ जिल्ह्यात कमी पाऊस! राज्यात १ टक्काच पेरणी, ७५ मि.मी.ओलावा असल्यावरच करा पेरणी
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप अन् नियोजन
- ५० प्रश्नांची असेल विद्यापीठाची प्रश्नपत्रिका
- प्रत्येक पेपरसाठी एक तासांचा असणार वेळ
- ५० गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील एका प्रश्नासाठी असेल एक गुण
- १४ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत चालणार परीक्षा
- परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसांत जाहीर होईल निकाल
हेही वाचा: ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता
छपाई केलेल्या प्रश्नपत्रिकांचे काय?
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत साधारणत: १०९ महाविद्यालये आहेत. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी एकूण ७० हजारांपर्यंत विद्यार्थी आहेत. त्यांची परीक्षा आता ऑफलाइन होणार असल्याने विद्यापीठाने प्रश्नपत्रिकांची छपाई केली. त्यासाठी अंदाजित एक कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, परीक्षाचे ठरलेले वेळापत्रक बदलून परीक्षा पद्धतीच बदलली आणि आता त्या छपाई केलेल्या प्रश्नपत्रिकांचे काय करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
Web Title: Univercity Exam Objective Type
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..