
प्रलंबित निकालामुळे विद्यापीठाची परीक्षा लांबणीवर! १९ जूनपासून परीक्षा; १ ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष
सोलापूर : परीक्षा दिली पण रेकॉर्ड सापडत नाही, चांगला पेपर लिहिला पण शून्य गुण मिळाले आणि परीक्षा देऊनही निकालात ‘गैरहजर’ शेरा आला, अशा विद्यार्थ्यांचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. आतापर्यंत अशा समस्या असलेले ४५ विद्यार्थी विद्यापीठाकडे आले असून आणखी उर्वरित विद्यार्थ्यांची माहिती विद्यापीठाने महाविद्यालयांकडून मागविली आहे. या पार्श्वभूमीवर आता परीक्षा १५ जूनऐवजी १९ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने फेब्रुवारी-मार्च महिन्यात सत्र परीक्षा घेतली. त्याचा निकाल अजूनही पूर्णपणे लागलेला नाही. ऑनस्क्रिन मूल्यमापनामुळे लवकर निकाल लागतील, असा विश्वास होता. पण, प्राध्यापकांची संख्या कमी आणि अडचणी अधिक, अशा अवस्थेमुळे निकालास विलंब झाला.
त्यातच विद्यापीठाने आगामी सत्र परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत देखील खूपच कमी देण्यात आली. पण, पहिला निकाल पूर्णपणे जाहीर झालेला नसताना पुन्हा दुसरी परीक्षा घेणे अडचणीचे ठरणार असल्याने विद्यापीठाने आता नियोजित वेळापत्रकात पुन्हा बदल करून परीक्षा चार दिवस पुढे ढकलली आहे.
दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्याची मुदत ९ जूनपर्यंत देण्यात आली आहे. तरीदेखील परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्याकडे केली आहे. मात्र, १ ऑगस्टपासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्याने मुदतीत परीक्षा घेण्याची धडपड सुरू आहे. पण, आता महाविद्यालयांनी निकाल प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती वेळेत न दिल्यास विद्यापीठासमोरील पेच वाढणार हे निश्चित.
विद्यापीठाचे १०९ महाविद्यालयांना पत्र
परीक्षेचा निकाल किमान ३० दिवसांत जाहीर होणे अपेक्षित आहे. पण, ७० दिवस होऊनही अजून निकाल पूर्ण झालेला नाही, हे विशेष. त्यामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे. आता विद्यापीठाने संलग्नित १०९ महाविद्यालयांना पत्र पाठवून ज्या विद्यार्थ्यांचा निकाल प्रलंबित (आरआर) आहे, ज्यांना परीक्षा देऊनही शून्य गुण मिळाले आहेत आणि ज्यांनी परीक्षा दिली पण उत्तरपत्रिकेवर गैरहजर शेरा पडला आहे, अशांची माहिती उद्या (गुरुवार) सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्यावी, असे पत्र विद्यापीठाने पाठवले आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, उत्तरपत्रिकेचा क्रमांक, पीआरएन नंबर, विषय, कोर्स, परीक्षेचा दिनांक, विषयाचा कोड, सेमिस्टर कोणते अशा मुद्द्यांची माहिती देण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर आहे.