विद्यापीठाच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक फायनल! १५ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा; मंगळवारपासून भरा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

higher education exam
विद्यापीठाच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक फायनल! १५ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा; मंगळवारपासून भरा अर्ज

विद्यापीठाच्या सत्र परीक्षेचे वेळापत्रक फायनल! १५ जून ते १५ जुलैदरम्यान परीक्षा; मंगळवारपासून भरा अर्ज

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची सम सत्र परीक्षा १५ जूनपासून सुरु होणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार, नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात १ ऑगस्टपूर्वी म्हणजेच १५ जुलैनंतर होणार आहे. तत्पूर्वी, सत्र परीक्षा संपविली जाणार असून निकालापूर्वीच २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरु केले जाणार आहे.

सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्याच्या सम सत्र परीक्षेसाठी मंगळवारपासून भरा अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. साधारणतः एक महिन्यांचा अवधी त्यासाठी दिला जाणार आहे.

तत्पूर्वी, आता ज्या अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होतील, त्या कोर्सच्या विद्यार्थ्यांना लगेचच परीक्षेचे अर्ज करता येणार आहेत. आठ दिवसांत सर्वच अभ्यासक्रमांचे १०० टक्के निकाल जाहीर होतील, त्यादृष्टिने नियोजन झाले आहे. परीक्षेचे अर्ज भरून झाल्यानंतर १५ जून ते १५ जुलै या महिनाभरात परीक्षा संपवून लगेचच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल, असे कुलगुरुंनी सर्वच महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कळवले आहे.

सध्या सत्र परीक्षेच्या अनुषंगाने शनिवार, रविवारी देखील विद्यार्थ्यांचे तास घेतले जात आहेत. कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक सत्र पूर्वपदावर आणून ९० दिवसांनंतर नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्राची परीक्षा दिवाळीपूर्वी घेतली जाणार आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सत्र परीक्षा व नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जात आहे.

१५ जुलैनंतर नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १ ऑगस्टपूर्वी शैक्षणिक नवीन सत्र सुरु करायचे आहे. एक-दोन दिवसात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शेवटच्या सत्र परीक्षेचे अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. १५ जून ते १५ जुलै या काळात ही सत्र परीक्षा संपविण्याचे नियोजन आहे.

- डॉ. रजनीश कामत, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांमध्ये होणार आहे. बारावी उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या धोरणानुसार प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यात संशोधन, विद्यार्थ्यांची आवड, कौशल्यपूर्ण शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. आता पदवी-पदवीत्त्युरचा अभ्यासक्रम चार वर्षांचा असणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना इतर अभ्यासक्रमांमधील आवडीचा विषय देखील निवडता येणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित जिल्ह्यातील १०९ महाविद्यालयांचे अभ्यासक्रमानुसार ‘क्लस्टर’ केले जाणार आहे. प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी नवीन शैक्षणिक धोरण जाणून घ्यावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.