बापरे! दिवेगव्हाण परिसरात हा कोणता भयानक प्राणी वावरतोय!

Bibatya
Bibatya

केत्तूर (सोलापूर) : दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथील शेतकरी रावसाहेब शिंदे व बबन पाडुळे यांच्या शेतात शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास उसाला पाणी देण्यासाठी जाताना बिबट्यासदृश प्राणी दिसला असल्याचे प्रत्यक्षदर्शी बंडू जाधव, सोमनाथ शिंदे, संतोष मोरे, दगडू महाडिक, सतीश खाटमोडे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. गांभीर्याने लक्ष देऊन याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या वेळी त्यांनी सावधानता बाळगत गावातील युवकांना व शेतकऱ्यांना बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्याबरोबर दिवेगव्हाण गावाशेजारी कुंभारगाव येथील शेतकरी अनिल टेंबरे यांना त्यांच्या शेतातील वस्तीजवळ बिबट्यासदृश प्राणी दिसला असल्याचे सांगितले.

वनविभागाने घेतले ठशांची छायाचित्रे
दोन वर्षांपूर्वी पश्‍चिम विभागातील उजनी जलाशयाच्या काठाजवळ ऊस पट्ट्यात पारेवाडी, हिंगणी, वाशिंबे, सोगाव आदी भीमा नदीच्या परिसरात बिबट्या व त्याच्या पिल्लांनी शेतकऱ्यांना दर्शन दिले होते. तर, उंदरगाव येथील शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी बिबट्या दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून त्यांच्या तज्ज्ञांमार्फत ठशांची तपासणी केली होती. त्यावेळी वनविभागाने ठसे बिबट्याचे नसून तरस किंवा अन्य प्राण्याचे आहेत, असे सांगून बिबट्या असल्याचा दावा फोल ठरविला होता. परंतु, प्रत्यक्षदर्शी शेतकरी व नागरिकांनी सतर्कता दाखवत प्रशासनास जागरूक करून व वेळोवेळी पाठपुरावा करत वनविभागामार्फत सोगाव, वाशिंबे व उंदरगाव परिसरातील उसाच्या शेतात पिंजऱ्यांचा सापळा लावला आणि काही दिवसांतच बिबट्याला उंदरगावचे शेतकरी चंद्रकांत कुंभार यांच्या शेतातील पिंजऱ्यात जेरबंद केले होते. आज दिवेगव्हाण ग्रामस्थांच्या वतीने सरपंच भरत खाटमोडे यांनी वनविभागास कळविल्यानंतर विभागाचे कर्मचारी दादा चव्हाण व सहायक कल्याण कदम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ठशांची पाहणी केली व छायाचित्रामार्फत ठशांचे नमुने पुढील कार्यवाहीकरिता वरिष्ठांपर्यंत पोचविले आहेत.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकरी रात्री-अपरात्री शेतात पाणी देण्यास जातात. त्याकरिता शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी तसेच प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एखादी वाईट घटना घडण्याची वाट न पाहता योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तत्काळ कराव्यात.
- भरत खाटमोडे,
सरपंच, दिवेगव्हाण

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणास भेट देऊन ठशांचे नमुने छायाचित्रांद्वारे आमच्या कार्यालयाकडे पाठवले. परंतु, ठशांची तपासणी केली असता सदर ठसे तरस या वन्यजीव प्राण्याचे असल्याचे आढळले आहे. हा प्राणी एका ठिकाणी न थांबता भक्ष्याच्या शोधार्थ किंवा आश्रयासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो. बिबट्याच असेल तर तो किमान एक किंवा दोन दिवसांत पाळीव प्राणी किंवा अन्य प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवितो. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून वेळोवेळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहावे.
- सुरेश कुर्ले,
वनरक्षक, विभागीय कार्यालय, मोहोळ

आम्ही पाहिलेला प्राणी बिबट्याच असून आधीही वनखात्याने उंदरगाव येथील शेतकऱ्यांनी केलेला बिबट्या दिसल्याचा दावा खोटा ठरवला होता. परंतु, येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करत त्यांनी केलेला दावा सत्यात उतरवला होता. त्याकरिता प्रशासनाने व वनविभागाने याकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने लक्ष देऊन होणारा अनर्थ टाळावा.
- सोमनाथ शिंदे,
प्रत्यक्षदर्शी शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com