esakal | विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने केली ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड
sakal

बोलून बातमी शोधा

Vitthalrao Shinde Co-operative Sugar Factory Senior Director, Wamanrao Ubale, distributed Faral to sugarcane harvesters.jpg

विठ्ठलराव शिंदे कारख्यान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून याकरिता साखर कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा कार्यरत आहे.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने केली ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : उदरनिर्वाहासाठी शेकडो किलोमीटर दूर अंतरावरून अनेक कुटूंबे ऊस तोडणी करण्यासाठी अगदी लहानांपासून ते थोरा-मोठ्यांपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांकडे जात असतात. ऐन सणासुदीच्या काळात ही कुटुंब घर सोडतात. त्यामुळे त्यांची दिवाळी ही ऊसाच्या फडावर साजरी होत असते. माढ्याचे आमदार तथा विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बबनराव शिंदे यांनी ही परिस्थिती विचारात घेऊन विठ्ठलराव शिंदे कारख्यान्याकडे आलेल्या ट्रक, टॅक्टर, बैलगाडीवरील सुमारे ३५ हजार ऊस तोडणी मजूरांना फराळाचे वाटप करून माणुसकी जपली आहे. ऊस तोडणी कामगारांनी याबद्दल आभार मानले असून आमदार बबनराव शिंदे यांच्या या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विठ्ठलराव शिंदे कारख्यान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरू असून याकरिता साखर कारखान्याकडील ऊस तोडणीची यंत्रणा कार्यरत आहे. साखर कारखान्याचा माढा, पंढरपूर, माळशिरस, करमाळा, इंदापूर, परांडा, मोहोळ या तालुक्यांमध्ये नोंदी प्रमाणे ऊस तोडीचा कार्यक्रम सुरु आहे. सर्व ऊस तोडणी करणारे मजूर विविध भागात काम करत आहेत. त्यांच्यासाठी विठ्ठलराव शिंदे साखर कारख्यान्याने गेल्या आठ दिवसापासून कारखाना स्थळावरून 30 टनाची बुंदी व 15 टन चिवडा बनवून तयार केला आहे.

त्यासाठी जवळपास 75 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे. गोरगरीब ऊस तोडणी मजूरांची दिवाळी गोड व्हावी, या उदान्त हेतूने अहोरात्र काबाड कष्ट करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाना दोन किलो बुंदी व एक किलो चिवडा यांचे पॅकींग तयार करून उसाच्या फडावरच काम करत असलेल्या ठिकाणी फराळाचे साहित्य कारखान्यामार्फत पोहोच केले जाणार आहे. शुक्रवार (ता.13) पासून प्रत्येक वाहनाच्या टोळीवरील व बैलगाडीच्या 35 हजार मजूरांना पॅकींग पोहोच करण्याचे काम सुरू झाले आहे.

विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संस्थापक आमदार बबनराव शिंदे यांच्या संकल्पनेतून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना हा नेहमी सामाजिक उपक्रम राबवित आलेला आहे. यापूर्वी देखील अनेक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख या साखर कारखान्याने आत्तापर्यंत निर्माण केलेली असल्याचे  कारखान्याचे कार्यकारी संचालक आर. एस. रणवरे यांनी सांगितले. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे म्हणाले, दरवर्षी स्वत:च्या घरापासून पाच महिने पर मुलाखत जाऊन मजूरी करणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या मुलाबाळांना दिवाळीमध्ये गोड काही तरी द्यावे, हा विचार मनात ठेऊन कारखान्यामार्फत १६ हजार कुटुंबांतील मजुरांना प्रत्येकी दोन किलो बुंदीचे लाडू व एक किलो चिवडा याचे पॅकिंग करुन देण्याचे काम केले. त्यामुळे त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद मिळेल.  
          
संपादन - सुस्मिता वडतिले 
 

loading image