esakal | जनता कर्फ्यू : सोलापूर जिल्ह्यात कोठे काय? जाणून घ्या एकाच ठिकाणी
sakal

बोलून बातमी शोधा

Where is Janata Curfew in Solapur district

कोरोनाचा सोलापुरात एकही रुग्ण सापडलेला नसला तरी महाराष्ट्रात मात्र, दिवसांदिवस लागण झालेल्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. याचपार्श्‍वभूमीवर सोलापुर जिल्ह्यात प्रशासनाने योग्य ती खबरादारी घेतली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत सोलापुरकर सज्ज झाले आहेत.

जनता कर्फ्यू : सोलापूर जिल्ह्यात कोठे काय? जाणून घ्या एकाच ठिकाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार सोलापूर जिल्ह्यात नागरिकांनी उर्त्स्फुतपणे पाठींबा दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून नागरिक यामध्ये सहभागी झाले आहेत. पंढरपुरात सकाळपासून शांतता आहे.

कोरोनाचा सोलापुरात एकही रुग्ण सापडलेला नसला तरी महाराष्ट्रात मात्र, दिवसांदिवस लागण झालेल्या रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. याचपार्श्‍वभूमीवर सोलापुर जिल्ह्यात प्रशासनाने योग्य ती खबरादारी घेतली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत सोलापुरकर सज्ज झाले आहेत. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार सोलापुरातील नेहमी गजबजलेली नवी पेठ शनिवारपासून बंद होती. यासह वाहतुकसेवा, भाजी मंडई रस्त्यावरही याचा परिणाम जाणवत आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. यातूनच करमाळा आणि मंगळवेढा तालुक्‍यात कायद्याचे उल्लंगन केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हे दाखल झाले आहेत. याचा ‘सकळ’ने घेतलेला हा आढावा...

माढा : माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय आदेशानुसार अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. तर दोन दिवसांपासून पुणे, मुंबईहुन कुर्डुवाडी मार्गे बाह्यवळण रस्त्यावरुन बार्शी, मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकांच्या खासगी गाड्यांची संख्या खूप वाढली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या जास्त आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानकावर मात्र प्रवाशांची तुरळक संख्या होती. शहरातील दुकाने व्यापाऱ्यांनी उघडली नाहीत. बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता. दवाखाने, मेडिकल, भाजीपाला, किराणा, पेट्रोल पंप यासारख्या अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरु होत्या.

पंढरपूर : पंढरपूरमध्ये शनिवारी आणि रविवारी दोन दिवस शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून स्वतः चे संरक्षण करावे असे आवाहन पंढरपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. त्यांच्या अहवानाला पंढरपूरकरांनी आज उस्फूर्त प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अत्यावश्‍यक सेवा वगळता शहरात शनिवारी व्यापार्यांनी शंभर टक्के बंद दुकाने बंद ठेवली होती. बंदमुळे शहरात लोकांची व वाहनांची तुरळ वर्दळ दिसून आली. दरम्यान तीर्थयात्रेसाठी उत्तरप्रदेशात गेलेल्या उपरी (ता.पंढरपूर) येथील 43 नागरिकांची तपासणी करुन त्यांचे त्यांच्याच घरी विलीकरण कऱण्यात आले आहे.

सांगोला : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोल्ट्री व्यावसायिकांना आर्थिक मदत द्यावी, स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावे, छोट्या व्यावसायिकांना उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत द्यावी, याकरिता भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी तहसीलदार योगेश खरमाटे यांनी निवेदन दिले. पोल्ट्री व्यवसाय संकटात असून व्यापारी, ग्राहकांनी पक्षी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. पोल्ट्री व्यावसायिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न करावा. याकरिता 13 मार्चला सोलापूरच्या पशुसंवर्धन उपायक्तांना निवदेन दिले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांशी याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

माळशिरस : "कोरोना'ची माहिती माळशीरस तालुक्‍यातील अकलूज शहरात रहिवाशांना चौकाचौकात बसविलेल्या स्पीकरद्वारे एकाचवेळी देण्यात येत आहे. अकलूज ग्रामपंचायतच्या वतीने शहरभर सीसीटीव्ही व चौकात साउड सिस्टीम बसविली आहे. ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यातून स्पीकरद्वारे आपत्कालीन सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रणालीचा "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर प्रभावीपणे वापर करण्यात आला. अकलूज ग्रामपंचायतच्या वतीने शहर व परिसरातील नागरिकांना माहितीपत्रक व डिजिलद्वारे "कोरोना' आजाराची लक्षणे व उपाययोजनेबाबत आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

मोहोळ : मोहोळमध्ये "कोरोना'या जागतिक संसर्ग साथीचा मुकाबला करीत या महामारीला रोखण्यासाठी शासन व प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व व्यापारी बांधवानी आपली दुकाने शंभर टक्‍के बंद ठेवल्यामुळे बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. शहरासह तालुक्‍यामध्ये 21 ते 31 मार्च दरम्यान जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षक, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची काही अपवाद वगळता चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसत होते. यासाठी चेंबर ऑफ कॉमसने पुढाकार घेत व्यापारी बंधुचे दुकाने बंद का ठेवणे गरजेचे आहे हे पटवून सांगितले होते. याबरोबर मंदीरे, मशिद, चर्च आदी बंद आहे.
 

मंगळवेढा कोरोनाचा अटकाव करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत मंगळवेढयातील मॉल चालकासह व चार दुकानदाराविरूध्द गुन्हा दाखल केला. आजपासूनच शहर बंद झाले. कोरोनाला अटकाव करण्यासाठी आरोग्य विभाग मात्र सतर्क झाला. सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणात होत असून लोकांची गर्दी होवू नये म्हणून अत्यावश्‍यक सेवा वगळता पानटपरी,चहा कॅंटीन, हॉटेल,ढाबे व इतर दुकाने बंद करण्याचा आदेश दिला. यातील काही व्यापाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला याबाबतची फिर्याद पो.ना. राजकुमार ढोबळे व विकास क्षीरसागर यांनी दिली.

अक्कलकोट : अक्कलकोटमधील मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कुल दहावीच्या परीक्षा केंद्रावर इतिहास पेपरच्यावेळी केंद्रसंचालक ए. आर. कांबळे यांनी परीक्षार्थींच्या हातांना परीक्षा सुरू होण्यापुर्वी सॅंनिटायझर लावले. कोरोना संसर्गाच्या वाढत्या रूग्णामुळे विद्यार्थ्यांना सॅंनिटायझरचे महत्त्वही कळावे व त्यांचे हात स्वच्छ व्हावेत व मास्कचा वापर करावा यासाठी केंद्रसंचालक ए. आर. कांबळे, बिल्डींग कंडक्‍टर एस. व्ही. भांगरे, बिल्डिंग कंडेक्‍टर आर. बी. भोसले यांच्या मदतीने सर्व परीक्षार्थींचे हात हॅंन्डसॅंनिटायझरने स्वच्छ करण्यास लावले.
 

बार्शी बार्शी बाजारपेठेत शनिवारी दिवसभर दुकाने बंद असल्याने शुकशुकाट होता. बाजारचा दिवस असतानाही पूर्ण बाजार बंद ठेवून सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास प्रतिसाद दिला. सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी व सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश जाहीर होताच बार्शी शहर व तालुक्‍यात शुक्रवारी रात्री साडेआठनंतर व शनिवारी पूर्ण दिवस व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला. बार्शी आगाराच्या शुक्रवारी 126 फेऱ्या प्रवाशांअभावी रद्द करण्यात आल्या तर शनिवारी प्रवासी पाहून व्यवस्था करण्यात येत होती.

करमाळा : "करोना' व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करमाळ्यात आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. सूचना देऊनही बंद न ठेवणाऱ्या 12 दुकानदारांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी दिली. विशेष म्हणजे करमाळा आगारातून शनिवारी एकही एसटी बाहेर निघाली नाही. बसस्थानकात तुरळक ठिकाणीच प्रवासी दिसत होते. चारपेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊ नयेत यासाठी नगरपरिषद, पोलिस प्रशासनाने यांच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात आली. सकाळपासून पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातून गस्त घालण्यास सुरवात केली. सकाळी काही दुकाने उघडण्यात आली होती. ही सर्व दुकाने बंद करण्यात आली.