जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? ४ तालुक्यात मुलींचा जन्मदर चिंताजनक; ७ तालुक्यात‌ मुलींचा वाढतोय जन्मदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby abort.jpg
जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? ४ तालुक्यात मुलींचा जन्मदर चिंताजनक; ७ तालुक्यात‌ मुलींचा वाढतोय जन्मदर

जिल्हा प्रशासन लक्ष देईल का? ४ तालुक्यात मुलींचा जन्मदर चिंताजनक; ७ तालुक्यात‌ मुलींचा वाढतोय जन्मदर

सोलापूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात मुलींचा जननदर वाढल्याची बातमी सुखद धक्का देणारी ठरली. गेल्या कित्येक वर्षांपासून मुलांचेच सरासरी प्रमाण वाढत होते. त्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात सातत्याने होणारी घट चिंतेची बाब होती. परंतु, गेल्या महिन्यातील प्रगती पाहता समाधानाची लकेर उमटत आहे. सोलापूर जिल्ह्यात एक हजार मुलांमागे आता ही सरासरी ९९२ वर आली आहे. ज्या चार तालुक्यात अद्यापही मुलींचा जननदर वाढलेला नाही, तेथे शासनाला विशेष मोहीमच हाती घेऊन काम करावे लागणार आहे. यासाठी प्रबोधनासाठी ‘सकाळ' आपल्या पाठिशी राहील.

शासनाकडून वारंवार मुलींच्या जन्मदराबाबत सकारात्मक पावले उचलली जात असताना जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागालगतचा असल्याने शिक्षितांच्या प्रमाणाबरोबरच, मुलासाठीचा अट्टहास अधिक होता. अलीकडील काळात मानसिकतेत झालेला बदल तसेच मुलगा-मुलगी भेदभाव नष्ट होण्याच्या प्रक्रियेत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यातच शासनाने स्त्री भ्रूण हत्याविरोधी हाती घेतलेली मोहीम, गर्भलिंग तपासणीचे कडक कायदे, यामुळे मुलींचा टक्का वाढू लागला आहे. ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी‘ असे स्लोगन वाचताना खूप बरे वाटते.

दरम्यान, ‘वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा’ असा हव्यासही एकीकडे केला जातो, त्याचेही वैषम्य वाटल्याशिवाय राहात नाही. फक्त मुलगी अपत्य असलेल्या पालकांसाठी सोलापूर शहर व जिल्ह्यात काही सामाजिक संस्था कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून या पालकांचे विविध कार्यक्रम घेतले जातात. काही वैयक्तिक व सामाजिक पातळीवर प्रोत्साहन दिले जाते. मुलींच्या जन्माचे वैशिष्ट्यपूर्ण सोहळे साजरे केले जातात.

अकलूजच्या ‘डॉटर मॉम' या संस्थेच्या कार्याने तर राज्याची सीमा ओलांडली आहे. बहुधा या सामाजिक जाणिवा आणि शासकीय पातळीवरील प्रयत्नांमुळे अलीकडील काळात मुलींचा वाढलेला जननदर सुखावह आहे. स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीत तर मुलींचा टक्का मुलांनाही मागे टाकणारा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नुकत्याच लागलेल्या निकालात पहिल्या पाचाच मुलींचाच झेंडा आहे.

जिल्हा प्रशासनाने ‘या’कडे द्यावे विशेष लक्ष

एप्रिल महिन्यात अकलूजमध्ये दर हजार मुलांमागे एक हजार ५००, सांगोल्यात एक हजार १६७, अक्कलकोट एक हजार १५४, दक्षिण सोलापूर एक हजार ९३, कुर्डुवाडी-टेंभुर्णी एक हजार ८३, मंगळवेढा एक हजार ५६, वैराग एक हजार ५४, माढा एक हजार ४८, करमाळा एक हजार ४३, पंढरपूर मात्र ९६९ वर आहे. अकलूजमध्ये टक्का वाढलेला असला तरी माळशिरस तालुका मात्र मागे आहे. येथे दर हजारी ८३३ प्रमाण आहे.

बार्शी तालुक्यात ८८४, उत्तर सोलापूर तालुका सर्वात मागे असून येथे दर हजारी हे प्रमाण ७७५ आहे. जिल्हा परिषदेला व शासनाला चार तालुक्यांवर लक्ष केंद्रित करुन विशेष मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेकडून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ‘ या मोहिमेअंतर्गत शासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. शासनाने मुलींचा जननदर वाढावा म्हणून ‘माझी कन्या भाग्यश्री‘ योजनाही सुरु केली आहे. याचा ३०० हून अधिक कुटुंबीयांनी लाभ घेतल्याची नोंद आहे.

जन्मदाता छे, तो तर नराधमच!

सोलापूर जिल्ह्यात एकीकडे एप्रिलमध्ये मुलींचा टक्का वाढलेला दिसत असताना दुसरीकडे मात्र एका विदारक घटनेने मन हेलावले गेले. आई-वडिलांमध्ये झालेल्या फारकतीनंतर विकृत मनोवृत्तीच्या या जन्मदात्याने आपल्या पोटच्या गोळ्याला अगदी बारा वर्षांच्या मुलीला कला केंद्रात एकदा नव्हे तब्बल सातवेळा विकले. मन विषण्ण करणारी तसेच वेदना देणारी ही महाभयंकर अशीच घटना. मुलीचा बाजार मांडणारा तो नराधम बाप व खरेदीदार आण्टी सध्या गजाआड आहेत.