Solapur : सौंदरेच्या सरपंचबाई ४८ तासांत सापडल्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : सौंदरेच्या सरपंचबाई ४८ तासांत सापडल्या!

सोलापूर : बार्शी तालुक्यातील सौंदरे गावच्या महिला सरपंच चार-पाच दिवसांपूर्वी अचानक गायब झाल्या होत्या. जिल्हा पोलिसांनी त्याची माहिती मिळताच तातडीने यंत्रणा कामाला लावली व अवघ्या ४८ तासांत त्या महिला सरपंचास शोधून काढले.

रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमातून त्यांना पोलिसांनी सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यांच्या गायब होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. एकीकडे सरपंचबाईंना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. पण, २० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभींना शहर पोलिस शोधू शकले नाहीत. सौंदरे गावच्या सरपंच अचानक गावातून बेपत्ता झाल्या. गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी गाव सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली.

त्याबाबतची माहिती समजताच सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली. त्या सरपंच महिलेचा फोटो आणि वर्णन महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यांत पोचविण्यात आले. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चौकशी सुरू केली. सोशल मीडियातून आलेली माहिती पाहून रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमात आश्रयाला थांबलेल्या सरपंच महिलेची माहिती तेथील काहींनी दापोली पोलिसांना दिली. त्यांनी संबंधित वर्णनाची महिला आश्रमात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली व त्या सौंदरे गावच्या सरपंच असल्याचे स्पष्ट झाले. दापोली पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांना सुखरूप गावी आणले. ही सर्व प्रक्रिया पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पूर्ण केली.

राज्य महिला आयोगापर्यंत पोचली खबर

सौंदरे गावच्या महिला सरपंच गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. गावातील काहींनी त्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही दिली. त्यांनी तत्काळ ट्विट करत गावातील कोणत्या स्थानिक लोकांचा त्यांना त्रास होता का, याची माहिती घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे फर्मान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सोडले. पण, सरपंचबाईंनी तशी कोणतीही फिर्याद न दिल्याने त्यांच्या गायब होण्याचे गूढ कायम आहे.

सरपंच महिलाच असुरक्षित!

सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला सरपंच एक महिन्यात बेपत्ता होण्याचे उदाहरण एकमेव असेल. कवठे गावच्या सरपंच भाभी ७ सप्टेंबरला भरदुपारी बेपत्ता झाल्या. त्यांना शोधण्यात अद्याप शहर पोलिसांना यश आलेले नाही. दुसरीकडे, ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सतर्कतेमुळे सौंदरे गावच्या सरपंच महिला ४८ तासांत सापडल्या. पण, दोन महिला सरपंच बेपत्ता झाल्याने राजकारणात येऊन गावचा कारभार हाकणाऱ्या महिला सरपंचच असुरक्षित असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.