चिंता मिटली! सोलापुरातील ९ तालुके कोरोनामुक्त तर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona
चिंता मिटली! सोलापुरातील ९ तालुके कोरोनामुक्त तर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

चिंता मिटली! सोलापुरातील ९ तालुके कोरोनामुक्त तर शहर कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर

सोलापूर : शहर- जिल्ह्यातील दोन लाख २१ हजार ९३५ व्यक्तींना बाधित केलेला कोरोना आता शांत झाला आहे. कोरोनाने जिल्ह्यातील पाच हजार २४५ जणांचा जीव घेतला. आता कोरोनाची तीव्रता व प्रादुर्भाव कमी झाला आहे. सध्या शहरात सहा तर ग्रामीणमध्ये कोरोनाचे एकूण ११ रुग्ण सक्रिय आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुके तर शहरातील बहुतेक प्रभाग कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, बार्शी व मोहोळ या तालुक्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. विशेष बाब म्हणजे पंढरपूर तालुक्यातच सर्वाधिक ६७४ मृत्यू झाले आणि याच तालुक्यात जवळपास ३७ हजार रुग्ण आढळले. आता पंढरपूर शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी दोन रुग्ण सक्रिय आहेत. तर मोहोळ शहरात एक रुग्ण आहे. दिलासादायक बाब म्हणजे, मागील काही महिन्यांत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. प्रतिबंधित लसीकरणामुळे हा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. १२ वर्षांवरील सर्वांनाच प्रतिबंधित लस टोचण्यात आली. शहरात पाच महिला व एक पुरुष तर ग्रामीणमधील चार महिला आणि एका पुरुषाला कोरोनाची बाधा झालेली आहे. त्यातील काहीजण आता बरे होण्याच्या मार्गावर आहेत. त्या रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत.

धोका टळला, पण काळजी घ्या

शहरातील एक हजार १५१ तर ग्रामीणमधील तीन हजार ७३० जणांचा बळी घेणारा कोरोना आता बोथट झाला आहे. मृत्यूदेखील थांबले आहेत. बहुतेक लोकांचे लसीकरण झाले आहे. सध्या आढळलेल्या रुग्णांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळत नाहीत. तरीही, नागरिकांनी स्वत:बरोबरच कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घ्यावी. घरातील कोणी आजारी पडल्यास (खोकला, सर्दी, ताप) तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत, असे आवाहन लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी केले आहे.