अरे वा..! नोकरीच्या मागे न लागता तरुण अभियंता बनला उद्योजक !

Paver Block
Paver Block

सोलापूर : इंजिनिअरिंग व उच्चशिक्षित तरुण नोकरीसाठी स्वत:चे गाव, शहर सोडून पुणे-मुंबई गाठत आहेत. त्यातील अनेकांच्या पदरी निराशाच येत आहे. त्यामुळे एखाद्या नोकर भरती प्रक्रियेत शिपाई पदासाठीही आता इंजिनिअर व उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज दाखल होत आहेत. मात्र, येवती (ता. मोहोळ) या ग्रामीण भागातील सिव्हिल इंजिनिअरिंग केलेल्या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता उद्योजक होण्याचे ध्येय उराशी बाळगले व ते पूर्णत्वासही नेले आहे.

पेव्हर ब्लॉक निर्मितीचा सुरू केला उद्योग
आनंद पाटील असे 27 वर्षीय तरुण नवउद्योजकाचे नाव आहे. त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी न करता स्वत:चाच व्यवसाय किंवा उद्योग करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेची कंत्राटी कामे मिळवली. यात संरक्षक भिंत बांधणे, कॉंक्रिटीकरण अशी कामे करतो. ही कामे करत असताना पेव्हर ब्लॉक बाहेरून खरेदी करत होता. मात्र, उद्योजक होण्याच्या ध्येयाने वाटचाल करताना पेव्हर ब्लॉक निर्मितीचे तंत्र त्याने आत्मसात केले. पेव्हर ब्लॉक निर्मिती उद्योग सुरू करण्याचा विचार मनात पक्का केला, मात्र भांडवल नव्हते. त्याच्या मित्राने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज अनुदान योजनेची माहिती दिली. मग या योजनेचा आनंदने पाठपुरावा केला. प्रयत्नांती त्याला महामंडळांतर्गत मशिनरी खरेदीसाठी पाच लाख 60 हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले. यातून त्याने दोन व्हायब्रंट टेबल, कॉंक्रिट मिक्‍सर, कलर मिक्‍सर, रबर मोल्ड आदी मशिनरी घेतली. स्वत:च्या पैशातून कच्चा माल डस्ट, खडी व सिमेंटची खरेदी केली. दोन महिन्यांपासून पेव्हर ब्लॉक निर्मितीस सुरवात केली आहे.

दररोज चार ब्रासचे उत्पादन
प्लॅंटवर पाच व लोडिंग-अपलोडिंगसाठी पाच अशा 10 कामगारांना त्याच्या पेव्हर ब्लॉक प्लॅंटमुळे रोजगार मिळाला आहे. दररोज चार ब्रास उत्पादन घेतले जात असून, सर्व खर्च वजा जाता 45 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तालुक्‍यातील ठेकेदारांना ब्लॉक विक्री सुरू असून, वाहन खरेदी करून जिल्ह्यातही विक्री करण्याचा त्याचा निर्धार आहे. भविष्यात हा व्यवसाय विस्तारून अनेकांना रोजगार देण्याचा विचार त्याने "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला.

नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करावा, असे पहिल्यापासूनच वाटत होते. अन्‌ आता ते सत्यात उतरल्याने आनंद होत आहे. "अण्णासाहेब पाटील' योजनेमुळे हा योग आला व इतरांना रोजगारही मिळू लागला. युवकांनी नोकरदार होण्यापेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मला वाटते.
- आनंद पाटील, तरुण उद्योजक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com