
Solapur News: झेडपी शिक्षक जूनपासून नवीन शाळांवर! बदली झालेल्यांना ३१ मेपर्यंत कार्यमुक्ती; पुढचा टप्पा...
Solapur News : ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून यंदा जिल्हा परिषदेच्या शाळांवरील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली.
२८ जानेवारीला बदल्यांचा पाचवा शेवटचा टप्पा संपला. आता जिल्ह्याअंतर्गत बदली झालेल्यांना १ ते ३१ मे या कालावधीत सध्याच्या शाळेतून कार्यमुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत. जूनपासून ते नवीन शाळांवर रुजू होतील.
सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार ७९७ शाळांमधील दोन लाख दहा हजार विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
त्यानंतर १ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हाअंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश देईल. १२ जूनपासून त्या शिक्षकांनी मिळालेल्या शाळांवर हजर होणे बंधनकारक आहे. ऑनलाइन बदल्यांमुळे शाळा बदलून मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.
दरम्यान, आता सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील एक हजार १७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या आहेत. त्यांची यादी बुधवारी (ता. १) प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. त्यात संवर्ग एकमधील १८१ शिक्षक असून त्याअंतर्गत ५३ वर्षे वयोगट, गंभी आजार, एक किडनी, अर्धांगवायू किंवा लकवा आजार झालेले शिक्षक, विधवा, परितक्त्यांचा समावेश आहे.
तर संवर्ग दोनमध्ये ९८ शिक्षक असून पती व पत्नी दोघेही शिक्षक असून त्या दोघांच्या शाळांमधील अंतर ३० किलोमीटर पेक्षा जास्त आहे, अशांचा समावेश आहे. संवर्ग चारमध्ये एकाच शाळेवर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ७३८ शिक्षकांच्या बदल्या झाल्याचेही प्राथमिक शिक्षण विभागाने सांगितले.
पुढील टप्प्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या
ग्रामविकास विभागाला यंदा प्रथमच ऑनलाइन बदल्या होत असल्याने खूपच विलंब लागला. जूनपर्यंत अपेक्षित असलेल्या बदल्यांसाठी मार्च महिना उजाडला.
आता बदल्यांचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. पण, आता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांची जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया १५ मेनंतर हाती घेतली जाणार आहे. साधारणत: जुलैअखेरीस या बदल्या पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
त्यात सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील जवळपास चार हजार शिक्षकांच्या बदल्या होतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी सांगितले.
जिल्हाअंतर्गत बदली झालेले शिक्षक
संवर्ग एक
१८१
संवर्ग दोन
९८
संवर्ग तीन
७३८
बदलीतील एकूण शिक्षक
१,०१७