सोलापूरच्या डिसले गुरुजींची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात

सूर्यकांत बनकर
बुधवार, 13 मार्च 2019

तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगभरातील सर्वोत्तम 50 इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत डिसले गुरुजी विराजमान झाले आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, फ्लिपग्रीड, प्लीकेर्स, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर ते कार्यरत आहेत.

करकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या शिक्षकाने विकसीत केलेली 'क्यूआर कोड' पद्धत 2015 पासून क्रमिक पुस्तकांमध्ये वापरण्यास सुरुवात केलेली आहे. सध्या त्याचे सकारात्मक दृष्य परिणाम दिसू लागल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून हीच 'क्यूआर कोड' पद्धत संपूर्ण भारतात राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण भारतात रोशन होणार आहे.

श्रमिक पत्रकार संघाच्या वतिने करकंब येथिल रामभाऊ जोशी प्रशालेत तरुण शिक्षणतज्ञ रणजीत डिसले यांचा विशेष वार्तालाप आयोजीत केला होता. त्यावेळी त्यांनी ते सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. साकत (ता.बार्शी) येथिल श्री.डिसले यांची सन 2009 साली परितेवाडी (ता. माढा) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक झाली तेव्हा अक्षरशः त्या शाळेचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी नाही तर जनावरांसाठी केला जायचा. तेव्हा नाउमेद न होता त्यांनी प्राप्त परिस्थितीला संधी मानून काम करण्याचे ठरविले. पालकांचे प्रबोधन, गृहभेटी एवढेच नाही तर शेतामध्ये, गुरांमागे जेथे असतील तेथून त्यांनी विद्यार्थी गोळा केले.

मुलांना शाळा म्हणजे आनंदाचे ठिकाण वाटावे यासाठी कधीही पाठ्यपुस्तक हातात न घेता मोबाईल व लॅपटॉप तंत्रज्ञानाचा वापर चालू केला. पुढे शिक्षणाची उद्दिष्ट्ये अधिकाअधिक प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहचविता येतील याचा विचार त्यांच्या मनात घोळत असतानाच एका दुकानात त्यांना वस्तुंच्या किंमतीसाठी बारकोड पद्धत वापरल्याचे दिसले. ते पाहून 'अशीच एखादी पद्धत अध्यापनात वापरता आली तर...', या विचारातून आणि प्रयत्नातून त्यांनी 'क्यूआर कोड' पद्धत शोधून काढली. प्रथम स्वतःच्या शाळेत, नंतर माढा तालुक्यात आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वापरण्यात येत असलेली डिसले गुरुजींची ही 'क्यूआर कोड' पद्धत पुढील वर्षीपासून संपूर्ण भारतातील शालेय अभ्यासक्रमांच्या पाठ्यपुस्तकात वापरली जाणार आहे. विशेष म्हणजे जगातील अकरा देशांमध्ये सध्या डिसले गुरुजींची 'क्यूआर कोड' पद्धत वापरली जात आहे.

'वर्ल्ड इज माय क्लासरुम' ही संकल्पना सत्यात उतरवताना रणजीत डिसले सध्या 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप'च्या माध्यमातून जगभरातील 143 देशातील आठशेहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 'अराउंड द वर्ल्ड' या उपक्रमांतर्गत आकुंभे (ता. माढा) येथिल गावातील झाडांना 'क्यूआर कोड' पद्धत वापरुन त्यांनी तेथिल वृक्षलागवडीखालील क्षेत्र एकवीस टक्यावरुन तेहतीस टक्यांपर्यंत वाढविले आहे. याची दखल रशिया, अमेरिका यासारख्या देशांबरोबरच युनोने देखील घेतली आहे. भारत, पाकिस्तान, इराण, इराक यासारख्या आठ अशांत देशांमधील पाच हजार विद्यार्थ्यांची त्यांनी 'पीस आर्मी' तयार केली असून ही संख्या पन्नास हजार पर्यंत नेण्याच त्यांचा मानस आहे. या माध्यमातून युद्धसदृश परिस्थितीत त्या-त्या देशांमध्ये शांतता व सलोख्याचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. 

ग्लोबल डिसले गुरुजी -
तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण प्रयोग व असामान्य कार्य यामुळे जगभरातील सर्वोत्तम 50 इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत डिसले गुरुजी विराजमान झाले आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, फ्लिपग्रीड, प्लीकेर्स, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर ते कार्यरत आहेत. आपल्या केवळ नऊ वर्षाच्या सेवा काळात त्यांना बारा आंतरराष्ट्रीय आणि सात राष्ट्रीय पूरस्कार मिळाले असून बारा शैक्षणिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी डिसले गुरुजींच्या कार्याची 'हीट रिफ्रेश' ही विशेष चित्रफीत प्रकाशीत केली असून असा मान मिळालेले ते जगातील एकमेव शिक्षक आहेत. विशेष म्हणजे वार्तालाप प्रसंगी डिसले गुरुजींनी सर्व पत्रकार आणि उपस्थित शिक्षकांचा रशियातील शिक्षणतज्ञ 'अॅना झुबकोव्हस्काया' यांच्याशी पाऊण तास संवाद घडवून आणला. त्यातून रशियन व भारतीय शिक्षण पद्धतीविषयी चर्चा करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapurs Deslay Gurujis QR code method is complete throughout India