सोलापूरच्या चाव्या या बहीण भावाच्या हाती 

संतोष सिरसट
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

माजी आमदार पाटील ठरले "लकी' 
सोलापूर जिल्ह्याला अनेक मोठ्या राजकीय घराण्यांचा वारसा आहे. मात्र, त्यापैकी एकाही घराण्याला हा दुग्धशर्करा योग साध्य करता आलेला नाही. मात्र, माजी आमदार पाटील हे याबाबतीत "लकी' ठरले आहेत. एकाच कार्यकाळात त्यांचे चिरंजीव हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर कन्या सोलापूर नगरीच्या महापौर झाल्या आहेत

सोलापूर ः सोलापूरसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सोलापूरसारख्या मोठ्या शहराचा महापौरपद मिळणे ही गोष्ट अतिशय दुरापास्त आहे. सत्तेची ही दोन्ही पदे मिळविण्यासाठी अनेकजण अट्टहास करतात. मात्र, सोलापूरच्या इतिहासात घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही दोन्ही पदे मिळाली आहेत ती एका बहीण-भावाला. अशाप्रकारची ही घटना कदाचित राज्यातील पहिलीच घटना असण्याची शक्‍यता आहे. 

महाशिवआघाडी जिल्ह्याचे राजकारण बिघाडी 

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील हे 2017 मध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. माजी आमदार पाटील यांची कन्या शोभा बनशेट्टी याही 2017 च्या सोलापूर महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पाटील हे अपक्ष तर बनशेट्टी या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या त्रिशंकू स्थितीमध्ये अपक्ष असूनही पाटील यांना उपाध्यक्षपदावर काम करण्यासाठी संधी मिळाली. भाजपला महापालिकेत बहुमत मिळाल्याने पक्षाच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान बनशेट्टी यांना मिळाला. राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिंदे हे आमदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचे जिल्हा परिषदेचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळेच अध्यक्षपदी रद्द झाले. अध्यक्षांचे पद रद्द झाल्यामुळे घटनात्मकदृष्ट्या श्री. पाटील यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार आला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बहीण व भावाला महापौर व जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याचा मान एकाचवेळी मिळाला आहे. 

सोलापुरात होऊ शकतो महाशिवआघाडीचा महापौर 

पाटील व बनशेट्टी या दोघांनाही मोठा राजकीय वारसा आहे. वडील माजी आमदार असल्यामुळे साहजिकच राजकारण त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच रुजले आहे. बनशेट्टी यांचे आजेसासरेही (कै.) विश्‍वनाथ बनशेट्टी हे माजी महापौर होते. त्यामुळे बनशेट्टी यांचे सासरचे घराणेही राजकीयच आहे. राजकारणाच्या माध्यमातून सामाजिक काम करण्यावर या बहीण-भावाचा भर असतो. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी श्री. पाटील हे आपल्याला मिळालेल्या चार महिने अध्यक्षपदाच्या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा आहे. सोलापूरसारख्या झपाट्याने प्रगती करणाऱ्या स्मार्टसीटीमधील नागरिकांना सोई-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न मागील अडीच वर्षापासून बनशेट्टी करत आहेत. सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी त्यांच्या काळात मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. भाऊ ग्रामीण तर बहीण शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असल्याने शहरी-ग्रामीणचा चांगला मिलाप पाहायला मिळतो. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur's remote in the hands of sister & brother