जिल्ह्यात पाच ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

सोलापूर - अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. त्यामध्ये सौरऊर्जा हे एक प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्याचबरोबर शेजारील तुळजापूर तालुक्‍यातील केमवाडी या ठिकाणी एक प्रकल्प आहे. या सगळ्या प्रकल्पांतून दरमहा ८५.५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. 

सोलापूर - अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्यावर शासनाकडून भर दिला जात आहे. त्यामध्ये सौरऊर्जा हे एक प्रभावी माध्यम आहे. जिल्ह्यात पाच ठिकाणी सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत. त्याचबरोबर शेजारील तुळजापूर तालुक्‍यातील केमवाडी या ठिकाणी एक प्रकल्प आहे. या सगळ्या प्रकल्पांतून दरमहा ८५.५ मेगावॉट वीजनिर्मिती करण्याची क्षमता आहे. 

अपारंपरिक ऊर्जास्रोतांमध्ये सौरऊर्जेला फार महत्त्व आहे. जिल्ह्यात महावितरणच्या वतीने वीजपुरवठ्याचे काम केले जाते. जिल्ह्याला जवळपास ५३० मेगावॉटइतकी वीज दरमहा लागते. ही वीज साखर कारखाने व इतर माध्यमांतून घेतली जाते. जिल्ह्यात असलेल्या या पाच ऊर्जा प्रकल्पांमध्ये दरमहा साधारणपणे ६० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. सौरऊर्जा प्रकल्पामध्ये निर्माण करण्यात येणारी वीज ही वेगवेगळ्या ग्राहकांना दिली जाते. हा वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणच्या लाइनचा वापर केला जातो. जो ग्राहक जास्त भाव देईल, त्यांना वीज देण्याचा प्रयत्न या सौरऊर्जा कंपन्यांच्या माध्यमातून केला जातो. सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. कारण या ऊर्जेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर केल्यामुळे आर्थिक तोटाही सहन करावा लागत नाही. महावितरणच्या वीजपुरवठ्याला स्थिरता देण्याचे काम जिल्ह्यातील या सौरप्रकल्पाच्या माध्यमातून केले जाते.

सौरऊर्जा प्रकल्प व त्यांची क्षमता मेगावॉटमध्ये
मंगळवेढा औद्योगिक वसाहत- २०, सोलनवाडी (ता. सांगोला)- ६, मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर)- ३३.५, पोखरापूर (ता. मोहोळ)- १०, करजगी (ता. अक्कलकोट)- १० तर केमवाडी (ता. तुळजापूर)- १०.

पार्क मैदान, जलशुद्धीकरण केंद्र सौरऊर्जेवर
स्मार्ट सिटी आणि अमृत योजनेंतर्गत पार्क मैदान आणि पाकणी जलशुद्धीकरण केंद्र सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे. पाकणी जलशुद्धीकरण केंद्र सौरऊर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यासाठी १४ कोटी ७० लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून, योजना सुरू झाल्यावर वार्षिक दोन कोटी ७० लाख रुपयांची बचत होणार आहे. विजेवर होणारा खर्च वाचविण्याबरोबरच गरज भासेल तेव्हा उपलब्ध होणाऱ्या विजेची निर्मिती महापालिका करणार आहे. त्यासाठी पार्क मैदानावर सौरऊर्जेचा प्रकल्प बसविण्यात येणार असून, त्या माध्यमातून वीजनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.

Web Title: Solar power projects in five locations in the district