Raksha Bandhan 2019 : जीव वाचविणाऱ्या जवानाला मानले भाऊ; 13 वर्षांनी बांधली राखी (व्हिडिओ)

संजय खूळ
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

मी भावूक झालो राखी बांधताना. कारण या दिवशी गेली १३ वर्षे कुठे ना कुठे माहिमेवर असतो. पोस्टाने पाठविलेल्या राख्यांचीही चुकामूक होते. आम्ही कुठेही असलो तरी बहिणींचे प्रेम आमच्या सोबत असल्याची भावना यामुळे निर्माण झाली आहे.
- संदीप कुमार, एनडीआरएफ

रक्षाबंधन 2019
इचलकंजी : आपत्तीच्या काळात जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या एनडीआरएफच्या एका जवानाला तब्बल १३ वर्षांनी आज राखी बांधण्याचा योग आला. विशेष म्हणजे नैसर्गिक आपत्तीपासून ज्यांचे रक्षण केले, त्या बहिणींनीच या भावाला राखी बांधून खरे रक्षाबंधन साजरे केले. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी वेगवेगळ्या बचाव मोहिमांवर असलेल्या संदीप कुमार या जवानाला महिलांनी राखी बांधल्यावर तो काही क्षण भावूक झाला.

येथील डी. के. टी. इन्स्टिट्यूटमध्ये शिरोळ, कोल्हापूर आणि सांगली भागात काम करणाऱ्या जवानांसाठी रक्षाबंधनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी यातील जवान संदीप कुमार मनोहर यांनी आपणाला तब्बल १३ वर्षांनी राखी बांधली जात असल्याचे सांगितले.

देशात आपत्ती आली की, तिच्या निवारणासाठी अग्रभागी असतात ते एनडीआरएफचे जवान. वादळी वाऱ्याचे थैमान असो किंवा महापुराचा हाह:कार असो, यामध्ये सापडलेल्या लाखो नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे जवान तात्काळ त्याठिकाणी हजर होतात. लोकांना संकटातून वाचवतात. देशाच्या प्रत्येक आपत्तीच्या वेळी या जवानांचे कार्य कौतुकास्पद ठरले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक एक जीव वाचण्यासाठी हे जवान आपले कौशल्य पणाला लावतात. 

शिरोळ तालुक्यात आलेल्या महापुरात हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी हे जवळ गेले आठ दिवस अविरतपणे राबताहेत. अशा जवानांना अधिक सन्मान मिळाला तो स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा आणि रक्षाबंधन सोहळ्याचा. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना आज या ठिकाणी त्यांच्या अनेक भगिनींनी अत्यंत सन्मानाने राखी बांधली .

एनडीआरएफ, पुणेमध्ये असलेले संदीप कुमार मनोहर हे बिहारमधील आहेत. प्रत्येक रक्षाबंधननाच्या वेळी ते कोणत्या ना कोणत्या मोहिमेवर असतात. त्यामुळे त्यांना एवढी वर्षे घरी जाऊन बहिणीकडून राखी बांधून घेता आली नाही. आज तब्बल १३ वर्षांनंतर रक्षाबंधनाच्या दिवशी खरोखर त्यांनी ज्यांचे रक्षण केले, अशा बहिणींनी त्यांना राखी बांधली. त्यावेळी गहिवरलेल्या संदीप कुमार यांनी हा क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील, अशा भावना व्यक्त केल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soldier Sandeep kumar Clebrated Rakshabandhan after 13 years