सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची उजनीवर भिस्त 

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची उजनीवर भिस्त 

सोलापूर - शहराला पाणीपुरवठा होणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. परिसरातील टाकळी इंटकवेलमध्ये रविवारी रात्री सात फूट पाणी होते. हे पाणी आठवडाभर पुरण्याची शक्‍यता असून, त्यानंतर मात्र शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी योजनेवरच अवलंबून रहावे लागणार आहे.

दरम्यान, शहरासाठी मंगळवारपासून (ता.१५) पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी, सोडलेल्या पाण्याचा वेग कायम असेल तरच पाणी वेळेत पोचणार आहे. गतवेळेसारख्या अडचणी आल्यास जानेवारीअखेरपर्यंत पाणी पोचण्याची शक्‍यता आहे. 

शहराला पाणीपुरवठा होणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. टाकळी येथील भीमा नदीत असलेले सात फूट पाणी आठवडाभर पुरेल. बंधाऱ्याच्या पात्रात चर पाडून पाणी घेतले जात आहे. कर्नाटक हद्दीत पाणी साठवून ठेवले तर त्याचा सातत्याने उपसा होतो. त्यामुळे हे पाणी टाकळीच्या दिशेने सोडण्यात आले आहे. परिणामी बंधाऱ्याचे एका बाजूचे पात्र पूर्ण कोरडे आहे. बंधाऱ्यात असलेल्या मोटार उघड्या पडल्या आहेत. 

दरम्यान, उजनी धरणातून पाणी सोडण्याचे पत्र आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार मंगळवारपासून पाणी सोडणे अपेक्षित आहे. नऊ हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्यावेळी पाणी सोडल्यानंतर, उजनी धरण ते औज बंधारा दरम्यान असलेल्या अनेक बंधाऱ्यात पाणी पूर्णपणे भरून घेण्यात आले होते, तसेच नदीपात्राती खड्ड्यामुळेही शहराला पाणी पोचण्यात उशीर झाला होता. यंदा यासंदर्भात दक्षता घ्यावी लागणार आहे. अन्यथा धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात पोचण्यास जानेवारीअखेर उजडेल, असा दावा महापालिकेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे. 

... तर चार किंवा पाच दिवसाआड पाणी 
धरणातून सोडलेले पाणी 20 किंवा 22 तारखेपर्यंत बंधाऱ्यात पोचले नाही तर मात्र शहराला चार किंवा पाच दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठी फक्त उजनी ते सोलापूर योजनेवरच अवलंबून रहावे लागणार आहे. त्यामुळे धरणातून सोडलेले पाणी बंधाऱ्यात वेळेत पोचण्यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com