कोंडी गाव पाणीदार करण्यासाठी महाश्रमदानाचा निर्धार 

परशुराम कोकणे
सोमवार, 26 मार्च 2018

सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात सहभागी होऊन शहराजवळच असलेले कोंडी गाव पाणीदार करण्याचा निर्धार शेकडो सोलापूरकरांनी रविवारी केला. भुईकोट किल्ला परिसरात खंदक बागेत रविवारी झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा यावेळेत महाश्रमदान होणार आहे. 

सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या महाश्रमदानात सहभागी होऊन शहराजवळच असलेले कोंडी गाव पाणीदार करण्याचा निर्धार शेकडो सोलापूरकरांनी रविवारी केला. भुईकोट किल्ला परिसरात खंदक बागेत रविवारी झालेल्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 8 एप्रिल रोजी सकाळी आठ ते दहा यावेळेत महाश्रमदान होणार आहे. 

पाणी फौंडेशन व सत्यमेव जयते यांच्यामार्फत आयोजित वॉटर कप स्पर्धेत जिल्ह्यातील 300 पेक्षा जास्त गावे सहभागी होणार असून यात सोलापूर-पुणे रस्त्यावरील कोंडी गावाचाही समावेश आहे. येत्या 8 एप्रिल रोजी कोंडी गावात सकाळी 8 ते 10 या वेळेत या महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या श्रमदानामध्ये करावयाची कामे, गाव पाणीदार बनविण्यासाठी पाणी फाउंडेशनने विकसित केलेले तंत्र आदींविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

या श्रमदानात जास्तीत जास्त सोलापूरकरांनी सहभागी होऊन गाव पाणीदार करण्यास हातभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. या बैठकीमध्ये कोंडी, नान्नज, गुळवांची, अक्कलकोटसह शहरातील जलप्रेमी व पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी फौंडेशनला मदत करण्यासोबतच सोलापूर शहराला हरित सोलापूर बनवण्यासाठी, शहरातील पाणीसाठे वाढवण्यासाठी, ते शुद्ध करण्यासाठी कृतिशील होऊन उपक्रम राबविता येतील यावरही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. 

या बैठकीला पाणी फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य प्रतापसिंह परदेशी, समन्वयक विकास गायकवाड, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, जलकन्या भक्ती जाधव, सकाळचे मुख्य उपसंपादक राजाराम कानतोडे, माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक शिवाजी पवार, प्रा. मधुकर जाधव, आत्मा प्रकल्पाचे कल्पक चाटी, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, काशिनाथ भतगुणकी, अमोल मोहिते, सचिन पांढरे, योगीन गुजर, शिवाई शेळके, प्रीती श्रीराम, तुकाराम चाबुकस्वार, बसवराज जमखंडी, दत्तात्रय सणके, मनोज देवकर, विकास शिंदे, तिपय्या हिरेमठ, नितीन आणवेकर, प्राचार्य महादेव पाटील, प्रसाद मोहिते, सिद्धू बोंडगे, पिंटू ढगे, सचिन मोरे आदी उपस्थित होते. 

सोलापूरकरांना पाणी फाउंडेशनचे काम प्रत्यक्ष पाहता यावे. त्यांनाही सहभागी होता यावे म्हणून म्हणून आपण शहराजवळच असलेल्या कोंडी गावात 8 एप्रिल रोजी महाश्रमदान हा उपक्रम आयोजिला आहे. सोलापूरकरांनी कोंडी गावासाठी फक्‍त तीस मिनिटे द्यावीत. मॉर्निंग वॉकचा वेळ इकडे द्यावा. सहा बाय सहा या आकाराचा खड्डा केल्यावर एका पावसात पाच हजार लिटर पाण्याची साठवण होऊ शकते. आणि खड्डा करण्याचे काम फक्त अर्धा तासात होऊ शकते. 
- विकास गायकवाड, 

समन्वयक, पाणी फाउंडेशन

Web Title: Solhapur News Pani Foundation work in Kondi Gaon