"लेटकमर्स'ना बसणार आर्थिक भुर्दंड 

विजयकुमार सोनवणे
सोमवार, 26 मार्च 2018

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदणीसाठी "स्मार्ट यंत्रणा' बसविण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी वेळेत येण्याचे व जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या सुविधेचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, त्यांची कार्यालयीन माहिती कुठेही पाहण्याची सोय या यंत्रणेमुळे झाली आहे

सोलापूर - महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी "बायोमेट्रीक लिंक'चा उपयोग केला जाणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चार विभागातील कर्मचाऱ्यांचा पगार या पद्धतीने केला जात आहे. सातत्याने उशीरा येणारे "लेटकमर्स' या यंत्रणेमुळे दृष्टीपथात येणार असून, त्यांना आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्‍यता आहे. 

महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदणीसाठी "स्मार्ट यंत्रणा' बसविण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी वेळेत येण्याचे व जाण्याचे प्रमाण वाढले आहे. या सुविधेचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केले असून, त्यांची कार्यालयीन माहिती कुठेही पाहण्याची सोय या यंत्रणेमुळे झाली आहे. कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयात यावे यासाठी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्राधान्याने ही यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे कर्मचारी कार्यालयात कधी येतो, कधी जातो याची माहिती लगेच मिळणार आहे. बाहेर जाताना कर्मचारी थंबीग करतो की नाही याचीही नोंद असणार आहे, शिवाय तो कार्यालयात किती वेळ बसून होता याच्याही नोंदी होणार आहेत. 

ही सुविधा चांगली असली तरी त्यातून पळवाट निघणार नाही याची दक्षता प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. ऑनलाईन थंबींगची सोय असल्याने महापालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाऊन थंब करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे "लेटकमर'ची नोंद होऊ नये म्हणून काही कर्मचारी शहरातील महापालिकेच्या इतक कार्यालयात किंवा पालिकेच्या आवारातील कोणत्याही कार्यालयात जाऊन थंब करू शकतील. त्यावर उपाय म्हणजे, ज्या खात्यात कर्मचाऱ्याची नियुक्ती आहे, त्याच "युनिट'वर थंब करणे बंधनकारक करावे, तरच या यंत्रणेचा उपयोग होईल. अन्यथा एकही "लेटकमर' आढळणार नाही आणि ज्या उद्देशाने ही यंत्रणा बसविली तो उद्देशच साध्य होणार नाही. 

सध्या ही खाती आहेत "यंत्रणेवर' 
प्रायोगिक तत्त्वावर मुख्य लेखापाल, अंतर्गत लेखा परिक्षक, सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्य लेखापरिक्षक कार्यालयातील सुमारे 200 कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंदणी या पद्धतीने केली जात आहे. हळूहळू ही यंत्रणा महापालिकेच्या सर्व कार्यालयात तसेच खात्यातील कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात येणार आहे. 

Web Title: solpaur municipal corporation to have bio-metric punching system