'वॉर्ड मीटिंगमध्येच प्रभागातील समस्या सोडवा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

कोल्हापूर - प्रभाग समितीमध्येच प्रभागातील जास्तीत जास्त समस्या सोडवा, असे आदेश महापौर हसीना फरास यांनी आज छत्रपती शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या बैठकीत दिले. प्रभाग समिती सक्षम करून नगरसेवकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. 

कोल्हापूर - प्रभाग समितीमध्येच प्रभागातील जास्तीत जास्त समस्या सोडवा, असे आदेश महापौर हसीना फरास यांनी आज छत्रपती शिवाजी मार्केट प्रभाग समितीच्या बैठकीत दिले. प्रभाग समिती सक्षम करून नगरसेवकांचे प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने ही बैठक घेण्यात आली. 

परिवहन समिती सभापती नियाज खान, विरोधी पक्षनेता किरण शिराळे, गटनेता विजय सूर्यवंशी, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव, अजित ठाणेकर, नगरसेविका निलोफर आजरेकर, उमा बनछोडे आदींनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. यामध्ये महावितरण विभागाकडून झाडांच्या फांद्या छाटल्या जातात, त्यांच्याकडून किती पैसे भरून घेण्यात येतात? नगरसेवकांनी धोकादायक फांद्या तोडण्यास सांगितल्यास नियमावली दाखवली जाते. उद्यानातील मोडकळीस आलेली व धोकादायक खेळणी का काढली जात नाहीत? जुन्या झाडांचे ट्री गार्ड झाडे मोठी होऊनही काढलेली नाहीत, मागील वर्षी किती झाडे लावली? किती जगली? याचा अहवाल तयार करा, अशी विचारणा केली. 

सहायक आयुक्त सचिन खाडे यांनी सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तर देताना सांगितले की, उद्यान विभागास खराब खेळणी काढण्यासंबधी वॉर्ड ऑफिसला लेखी पत्र देण्याची सूचना केली. वॉर्ड ऑफिसने ती खेळणी दुरुस्त होत नसतील तर काढण्याची कार्यवाही करावी. जगलेल्या झाडांची माहिती संकलित केली आहे. ट्री गार्ड देणे बंद केले आहे. जुने ट्री गार्ड काढणे सुरू ठेवू. गार्डन कंपौंड वॉलसाठी 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बजेट उपलब्धतेनुसार सदस्यांचे बजेट खर्च टाकण्यात येत आहे. सर्व कनिष्ठ अभियंता यांनी सुरू असलेली कामे, मंजूर कामे, प्रक्रियेतील कामे व पूर्णत्वास आलेली कामांची संपूर्ण माहिती संबंधित नगरसेवकांना लेखी स्वरूपात देण्याची सूचना केली आहे. पंचगंगा हॉस्पिटल दुरुस्तीच्या मंजूर ठेकेदारास सात दिवसांची नोटीस दिली आहे. त्यांची मुदत संपल्याने आज पुन्हा दुसरी सात दिवसांची नोटीस दिली आहे. तरीही काम सुरू न केल्यास ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करू. 

बैठकीस सहायक नगररचना संचालक धनंजय खोत, आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर, उपशहर अभियंता एस. के. माने, शाखा अभियंता कुऱ्हाडे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, इस्टेट ऑफिसर प्रमोद बराले, सर्व कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक, विद्युत, उद्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. 

दीर्घकाळ गैरहजारांचे निलंबन करू... 
आरोग्य विभागाकडील जे कर्मचारी वारंवार गैरहजर राहतात अशा 57 जणांवर कारवाई सुरू आहे. काहींचे वेतन थकवले आहे, दीर्घकाळ गैरहजर असलेल्या 12 कर्मचाऱ्यांचे निलंबन करू, असे आरोग्य विभागाने सांगितले. पावसाळ्यापूर्वी नाले व गटर्स साफसफाईसाठी 24 जणांच्या दोन टीम तयार केल्या असून नाले सफाईचे काम सुरू केले आहे, असेही सांगितले.

Web Title: Solve the problem in the ward meetings