पाणी प्रश्न सोडविण्याबाबत आदित्य ठाकरे यांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सो़डवण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगोला येथे दिले.

मंगळवेढा : शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात व पिढ्यानपिढ्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी बैठक घेऊन मंगळवेढा तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सो़डवण्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना सांगोला येथे दिले.

यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख आ. तानाजीराव सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, उपजिल्हाप्रमुख तुकाराम भोजने, शहर प्रमुख रवि मुळे, विधानसभा संघटक विजय कुलबर्मे, तालुका प्रमुख तुकाराम कुदळे, शहर प्रमुख सुनिल दत्तू, शहर समन्वयक नारायण गोवे, उपशहर प्रमुख आप्पा शिर्के आदी उपस्थित होते.

म्हैसाळ योजनेच्या पाण्यापासून हुलजंती शिवणगी, सोड्डी, आसबेवाडी, लवंगी, मारोळी, सलगर या वंचित गावाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालय येथे बैठक झाली होती. याबाबत पुन्हा बैठक घेऊन निवडणुकीपूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील वगळलेल्या गावांचा समावेश करून निवडणुकीपूर्वी प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या कामास सुरुवात करण्यात यावी, जेणेकरून या भागाचा पिढ्यानपिढ्याचा दुष्काळ संपुष्टात येऊ शकेल, असे या निवेदनात म्हटले आहे.

या भागातील म्हैसाळ योजनेला युती शासनाने सुरुवात करून रखडलेल्या योजनेस निधी दिल्याने ही योजना आज पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे या भागाला युती शासन न्याय देऊ शकत असल्यामुळे यासाठी आचारसंहितेपूर्वी बैठक लावण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For solving water issues request to Aditya Thackeray