वीजबिल घोटाळ्यात आणखी काही साथीदार सहभागी 

घनशाम नवाथे 
Saturday, 16 January 2021

महापालिकेच्या सव्वा कोटी रुपयांच्या वीजबिल घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या ज्ञानेश्‍वर सदाशिव पाटील (रा. सांगलीवाडी) याच्या घराची झडती शहर पोलिसांनी घेतली. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सांगली : महापालिकेच्या सव्वा कोटी रुपयांच्या वीजबिल घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या ज्ञानेश्‍वर सदाशिव पाटील (रा. सांगलीवाडी) याच्या घराची झडती शहर पोलिसांनी घेतली. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच संशयित पाटील याने बिलामागे दहा टक्के सवलत देण्याचा फंडा अमलात आणल्याची माहिती पुढे येत आहे. संशयित पाटील याच्या चौकशीत आणखी काही साथीदार निष्पन्न होत असून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ज्ञानेश्‍वर पाटील हा महावितरण कंपनीत मानधनावर कार्यरत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडे मुख्यालयासह विविध कार्यालये, पाणीपुरवठा, पथदिवे आदीसाठी विजेचा वापर होतो. या वीज बिलाचा भरणा धनादेशाद्वारे होतो. मात्र महापालिकेच्या बिलाऐवजी दुसऱ्याच ग्राहकांच्या नावावर बिले भरल्याचे निदर्शनास आले. गेल्या वर्षभरात महापालिकेच्या बिलांची रक्कम महावितरणच्या खात्यात जमाच झाली नव्हती. महापालिकेकडून नियमित धनादेश भरणा होत असताना वीज बिलांची थकबाकी मात्र वाढतच चालली होती. थकबाकी कशी वाढते याची चौकशी केल्यानंतर घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर सांगली शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिका विद्युत विभागाने याबाबत तक्रार दिली आहे. 

शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश बागाव या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घोटाळ्यातील संशयित ज्ञानेश्‍वर पाटील हा महावितरणमध्ये मानधनावर कार्यरत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून काही दिवस तो पसार होता. त्याला नुकतेच अटक केली आहे. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर काही संशयास्पद कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. 

महापालिकेच्या धनादेशाची रक्कम तो ग्राहकांच्या नावाने भरत होता. त्यासाठी बिलामागे दहा टक्के सवलत देण्याचा फंडा सुरू केला होता. या ग्राहकांकडून तो रोख रक्कम स्वीकारत होता. त्यासाठी काही जणांना त्यांना नियुक्त केले होते. त्यामुळे घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. हा घोटाळा संगनमताने झाल्याची शक्‍यता पुढे येत आहे. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत. आणखी काहीजणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्‍यता आहे. संशयित पाटील याची पोलिस कोठडी शनिवारी संपत असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some more accomplices involved in the electricity bill scam