कलावंतांसाठी सोनाळा गाव बंद

कलावंतांसाठी सोनाळा गाव बंद

संग्रामपूर - सातपुडा परिसरातील प्रसिद्ध संत श्री सोनाजी महाराज सोनाळा यात्रा महोत्सवाला स्थानिक पोलिसांनी गालबोट लावण्याचा व गावाची बदनामीकारक अहवाल जिल्हा पोलिस प्रशासनाला पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबले. या भूमिकेचा निषेध म्हणून आज (ता. 29) सोनाळा गाव बंदचे आयोजन रसिकांनी केले आहे. या संदर्भात बुधवारी (ता. 28) सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थांनी बैठक घेऊन तसे निवेदन दिले आहे.

संत शिरोमणी सोनाजी महाराज यांचा यात्रा महोत्सव सध्या सुरू आहे. यात्रा असल्याने लोकनाट्य मंडळ कार्यक्रम करण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. लोककलेचा आदर म्हणून इतक्या लांबवरून आलेल्या कलावंतांवर अन्याय नको म्हणून गावातील प्रतिष्ठित, तंटामुक्त समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी परवानगी देण्याबाबत पोलिसांना विनंती केली. परंतु, पोलिसांनी परवानगी तर दिली नाहीच, उलट 27 नोव्हेबरच्या रात्री लोकनाट्यसमोर असलेल्या प्रेक्षकांना मारहाण केली. वाढीव पोलिसांना बोलावून गावभर फिरून वेगळे वातावरण निर्माण केले. यामध्ये यात्रेसाठी आलेल्या महिला, लहान मुले चेंगराचेंगरीत किरकोळ जखमीही झाले. यामुळे नागरिक भयभीत झाले असतानाही पोलिसानी दडपशाही सुरूच ठेवली. दरवर्षी शांततेत होणाऱ्या या यात्रा महोत्सव बाबत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या नावावर गावाची बदनामी केली आहे. वास्तविक पाहता या भागात  इतर बेकायदेशीर व्यवसायांना उत आलेला असताना त्यावर पोलीस काहीच करण्यास तयार नाहीत. उलट वरिष्ठांना चुकीच्या पद्धतीने अहवाल देऊन गावाची बदनामी होईल अशी माहिती देण्यात आली. यामुळे गावभर पोलीस प्रशासन विरोधी असंतोष पसरला आहे. या कृत्याचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी आज दिवसभर गाव बंदचे आयोजन  केल्याचे निवेदन पोलिसांना दिले आहे. 

वरिष्ठांना गावकऱ्यांनी दिले निवेदन
राज्यगृह मंत्री रणजित पाटील यांच्यासह आमदार डॉ. संजय कुटे आणि पोलिस विभागाचे वरिष्ठांना निवेदन देण्यात आले आहे. सोबतच सोनाळा परिसरात सुरू असलेले बेकायदेशीर व्यवसाय त्वरित बंद करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केले गुन्हे
जमावबंदी आदेश लागू असताना गैरकायद्याची मंडळी जमवून 27 नोंव्हेबरला रात्री घोषणाबाजी केल्याच्या कारणावरून सोनाळा पोलिसांनी 8 व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोना भानुदास तायडे यांनी तक्रार देत, सोनाळा यात्रेत कायदा व सुव्यवस्थेच्या कारणामुळे हरिभाऊ बडे यांच्या लोकनाट्य मंडळाला परवानगी नाकारली. यात टूनकी रस्त्यावर स्मशान भूमी जवळ मोठमोठ्याने घोषणाबाजी करून काही व्यक्ती परवानगी द्या असा आवाज करीत होते. त्यावेळी पोलिस अधिकारी यांनी जमावबंदी लागू असल्याने आणि तमाशाला परवानगी नाकारल्याने अशा बेकायदेशीर पणे एकत्रित येऊन घोषणाबाजी करू नका असे वारंवार समजून सांगितले. त्यानंतरही 20 ते 25 व्यक्ती घोषणा देण्यासाठी प्रवृत्त करीत होते. सदर माहिती वरिष्ठांना देऊन गोंधळ घालनाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी काही पळून गेले. त्यांपैकी 8 व्यक्तीवर सोनाळा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com