"त्या' पाच जागांसाठी  लवकरच निवडणुकीचा बिगूल 

विनायक लांडे
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

महापालिकेची निवडणूक 2018मध्ये झाली. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील "डीपीडीसी'वरील तीन सदस्यपदे रिक्त आहेत. नगरपालिका एक, जिल्हा परिषद वर्गातून (स्व.) शिवाजीराव गाडे यांच्या निधनामुळे ग्रामीणमधील एक सदस्यपद रिक्त आहे. एकूण पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मतदारयादीही काल (मंगळवारी) प्रसिद्ध करण्यात आली

नगर ः जिल्हा परिषद, महापालिका, नगरपंचायत क्षेत्रातून जिल्हा नियोजन समितीवर (डीपीडीसी) निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या 40 आहे. यांपैकी एका सदस्याचे अकाली निधन, तर उर्वरित चार जागांची मुदत संपल्याने पाच जागा रिक्त झाल्या. या जागांसाठी नुकताच मतदारयादी कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे "डीपीडीसी'च्या रिक्त पदांसाठी पुढील महिन्यात निवडणुकीचा बिगूल वाजणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. 

महापालिकेची निवडणूक 2018मध्ये झाली. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील "डीपीडीसी'वरील तीन सदस्यपदे रिक्त आहेत. नगरपालिका एक, जिल्हा परिषद वर्गातून (स्व.) शिवाजीराव गाडे यांच्या निधनामुळे ग्रामीणमधील एक सदस्यपद रिक्त आहे. एकूण पाच रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मतदारयादीही काल (मंगळवारी) प्रसिद्ध करण्यात आली. यात 370 मतदार आहेत. प्रारूप मतदारयादीसंदर्भात हरकती दाखल करण्याची मुदत उद्यापर्यंत (ता. 21) आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पोटनिवडणुकीची प्रक्रिया गतिमान होणार आहे. 
जिल्हा नियोजन समितीची जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका आहे. 

डीपीडीसीच्या निधीतून आमदार, खासदारांतर्फे विकासाचे प्रश्‍न मार्गी लागतात. रस्ते, पाणी, शिक्षण, कृषी अशा मूलभूत विकासासाठी डीपीडीसीच्या वार्षिक आराखड्यात नावीन्यपूर्ण प्रकल्पांना निधी उपलब्ध केला जातो. जिल्हास्तरावर पालकमंत्री नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हाधिकाऱ्यांकडे पदसिद्ध सचिवपदाची जबाबदारी असते. विद्यमान विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य या समितीवर निमंत्रित सदस्य असतात. याचबरोबर, जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार समितीवर शासनाकडून नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. 

जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनात डीपीसीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनाच्या दृष्टीने हीच समिती वार्षिक आराखडा बनवते. तो आराखडा राज्य सरकारला सादर झाल्यानंतर अर्थ विभागाकडून प्रस्तावित आराखड्यानुसार जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध होतो. मोठे नागरी क्षेत्र (महापालिका), लहान नागरी क्षेत्र आणि ग्रामीण नागरी क्षेत्र अशा तीन क्षेत्रातून निवडणुकीद्वारे उर्वरित सदस्य निवडले जातात.

तीनही क्षेत्रातून जिल्हा नियोजनवर निवडून दिल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या 40 आहे. 40 पैकी 35 सदस्य असल्याने त्यातील पाच रिक्त सदस्य पदासाठी पोट निवडणूक होऊ घातली आहे. यासाठी प्रारुप मतदार यादी मंगळवारी (ता. 19) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी संबंधित विभागाच्या कार्यालयाच्या ठिकाणी डकवण्यात आली आहे. गुरूवारी (ता. 21) हरकती दाखल करण्याची मुदत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पोटनिवडणुकीची प्रक्रिया जिल्हा निवडणूक शाखेतर्फे गतिमान होणार असल्याचे संकेत आहेत. 

प्रारूप यादीतील मतदारसंख्या 
महापालिका-68 
जिल्हा परिषद-72 
नगरपालिका-230 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Soon the election for those five seats."