गावावर शोककळा; भीषण अपघातात बापलेकाचा मृत्यू  

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

ट्रक पिकअपची धडक होवून झालेल्या अपघातात बापलेकाचा मृत्यू झाला आहे.

गोकाक (जि. बेळगाव) : ट्रक पिकअपची धडक होवून झालेल्या अपघातात बापलेकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गोकाक तालुक्यातील मुडलगी जवळील गुर्लापुर गावाजवळील पट्रोलपंपासमोर ही घटना घडली. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. नामदेव सावळाराम सावंत (वय-६६) व संजय नामदेव सावंत  (वय-३९) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील वाघराळी या गावचे रहिवाशी असून नामदेव सावंत हे वाघराळी गावचे माजी सरपंच आहेत. या दुर्घटनेत योगेश पंडित धनाजी (रा. मणगुत्ती, ता.हुक्केरी) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर गोकाक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे पण वाचा - धक्कादायक - पळून गेलेल्या मुलीला वडिलांची श्रद्धांजली; गावात लावले मोठे होर्डिंग

घटनास्थळावरून व वाघराळी गावातून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नामदेव व त्यांचा मुलगा संजय हे गुरुवारी सकाळी जनावरे खरेदी करण्यासाठी गोकाक तालुक्यातील मुडलगी येथे गेले होते. सावंत कुटुंबाचा दुग्धउत्पादन व्यवसाय असल्यामुळे ते नेहमी जनावरांची खरेदी करत असत. मुडलगी येथे जनावरांचा मोठा बाजार भरत असल्याने ते या बाजारासाठी गेले होते. नामदेव व संजय हे दुचाकीवरून नातेवाईक योगेश यांच्या गावी म्हणजे मणगुत्ती येथे गेले. तेथे दुचाकी ठेवून पिकअप घेऊन ते मुडलगिकडे रवाना झाले. पण ते मुडलगी गावात पोहोचलेच नाहीत. तीन किमी अलीकडे असलेल्या गुर्लापुर गावाजवळ अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की नामदेव यांचा जागीच मृत्यू झाला. संजय यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी गोकाक येथे नेण्यात आले. परंतु, उपचार सूरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 

हे पण वाचा - भाऊबंदकीच बेतली तिच्या जिवावर; मारून फेकले विहिरीत

या घटनेची नोंद मुडलगी पोलिस ठाण्यात झाली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेची माहिती गुरुवारी दुपारी वाघराळी गावात पोहोचली त्यानंतर गावात शोककळा पसरली. बाप व मुलाचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताची माहिती कळताच सावंत यांचे नातेवाईक व गावातील प्रमुख तातडीने मुडलगिकडे रवाना झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: soon father dead in accident at gokak