जिल्ह्यात तीन अत्याधुनिक प्रसूती कक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याबरोबर महिलांना आदरपूर्वक प्रसूती सुश्रुशेचा फायदा मिळण्यासाठी लक्ष्य उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण येथे अत्याधुनिक व प्रशस्त प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृहाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य महिलांना खासगी रुग्णालयाच्या तोडीच्या प्रसूती सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.

सातारा - माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्याबरोबर महिलांना आदरपूर्वक प्रसूती सुश्रुशेचा फायदा मिळण्यासाठी लक्ष्य उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड व फलटण येथे अत्याधुनिक व प्रशस्त प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृहाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य महिलांना खासगी रुग्णालयाच्या तोडीच्या प्रसूती सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.

देशाच्या भविष्यासाठी येणारी पिढी सुदृढ असणे आवश्‍यक असते. त्यामुळे माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून गर्भधारणेच्या कालावधीत मातेची काळजी घेण्यासाठीही उपक्रम राबविले गेले आहेत. माता आणि तीस दिवसांपर्यंतच्या बालकावर मोफत उपचार करण्याची ही योजना आहे.

त्याच्या पुढच्या टप्प्यात आता लक्ष योजनेअंतर्गत आदरपूर्वक प्रसूती सुश्रूशा (रिस्पेक्‍टफुल मॅटर्निटी केअर) हा उपक्रम देशभर राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शासकीय रुग्णालयांतील प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृह अद्ययावत करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी जिल्ह्यातील कऱ्हाड व फलटण येथील उपजिल्हा व साताऱ्यातील जिल्हा रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक अशा प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृहाची निर्मिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

संपूर्ण वातानुकुलित असणाऱ्या कक्षांमध्ये आधुनिक उपक्ररणांबरोबरच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छतागृह व इतर योग्य प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. साध्या व संसर्ग झालेल्या अशा दोन्ही प्रकारच्या प्रसूती शस्त्रक्रियागृहांमध्ये या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृहासाठी अत्यंत प्रशिक्षित असे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सुधारणा केल्यानंतर तीनही ठिकाणच्या या कक्षांची पहिल्यांदा स्थानिक पातळीवर व त्यानंतर जिल्हा पातळीवर तपासणी होणार आहे. ही तपासणी ६०० गुणांची असणार आहे. विविध पाच निकषांवर हे गुण दिले जाणार आहेत. जिल्हा पातळीवरील तपासणीमध्ये ६५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळाले तर, संबंधित शासकीय रुग्णालयाची राज्यस्तरावर निवड होणार आहे. तेथील तपासणीनंतर राष्ट्रीय पातळीवर रुग्णांची निवड होणार आहे.

त्यानुसार कऱ्हाड येथील रुग्णालयातील तपासणी पूर्ण झाली असून, त्याची राज्यपातळीवर निवड झाली आहे. सातारा व फलटण येथील कक्षांची लवकरच तपासणी होणार आहे. त्यानंतर अंदाजे एक मेपासून हे प्रसूती कक्ष व प्रसूती शस्त्रक्रियागृह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खासगी दवाखान्यांसारखी सुविधा नागरिकांना मिळणार आहे.

माता व बालमृत्यूचे प्रमाण रोखणे हे आरोग्य विभागाचे प्रथम कर्तव्य आहे. त्याच भावनेतून लक्ष्य योजनेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मातांना या सुविधेचा लवकरच लाभ मिळेल.
- डॉ. अमोद गडीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Sophisticated Maternity Room in district Woman Health