यंदाही विसर्जन आवाजाच्या भिंतींशिवाय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

आवाजाच्या भिंतीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका कायमच युवकांच्या बाजूने राहिली आहे.

सातारा : ध्वनिक्षेपकाच्या (आवाजाच्या भिंती) वापरामुळे गणेशोत्सव काळामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात येऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा आहे त्याच जागी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली असून, आजवर 266 यंत्रणा जागीच सील केल्या असून, दहा यंत्रणा जप्त केल्या आहेत. त्यामुळे आवाजाच्या भिंती गुरुवारपर्यंत (ता. 12) स्तब्ध राहणार आहेत. 
गणेश विसर्जन मिरवणूक व साताऱ्याचे एक वेगळेच नाते जोडले गेले आहे. मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात आवाजाच्या भिंती लावण्यावरून पोलिसांचा नेहमीच राजकीय नेते व युवकांबरोबर वाद राहिला आहे. त्यात आवाजाच्या भिंतीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांची भूमिका कायमच युवकांच्या बाजूने राहिली आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी साताऱ्यात रात्री बारानंतर खरी मिरवणूक सुरू व्हायची. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीला साताऱ्यात काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले असायचे. मात्र, पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांच्या काळापासून साताऱ्यातील आवाजांच्या भिंतींची प्रथा मोडीत निघाली. त्यानंतर दर वर्षी उदयनराजे काय करणार याची उत्सुकता असायची; परंतु प्रसन्नांनी घालून दिलेला पायंडा त्यांच्यानंतर अभिनव देशमुख व संदीप पाटील यांनी कायम ठेवला. त्यामुळे विसर्जन मिरवणूक दणदणाटाशिवाय वेळेत पार पडायला लागल्या. 
यंदाही उदयनराजेंनी आवाजाच्या भिंती पाहिजेतच, अशी भूमिका मांडली. त्यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांच लक्ष होते. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही आवाजाच्या भिंतीबाबत ठोस भूमिका घेतली आहे. विजर्सन मिरवणुकीत येणाऱ्या आवाजाच्या भिंतींवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यापुढे जात मागील वर्षाप्रमाणे आवाजाच्या भिंती रस्त्यावरच येऊ नयेत यासाठीही उपाययोजना करण्यात आलेली आहे. कलम 144 नुसार जिल्ह्यातील सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणाधारकांना त्यांच्या यंत्रणा आहे त्याच जागी सील करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देता येतात. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून तसा आदेश काढण्याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. त्याच्या आधारे अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी गुरुवार (ता. 12) रात्री दहापर्यंत जिल्ह्यातील सर्व मालकांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरात आणू नये, तसेच त्या स्वत:च्या कब्जात सील बंद स्थितीत ठेवाव्यात, असे आदेश काढले आहेत. 
जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या आदेशाची पोलिसांनी अंमलबजावणी सुरू केलेली आहे. जिल्ह्यातील सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा मालकांना याबाबतच्या नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आवाजाच्या भिंतींबाबत सर्वांचे साताऱ्याकडे लक्ष असते. त्यामुळे शहर आणि शाहूपुरी पोलिसांनीही नोटीस बजावणीची प्रक्रिया पार पाडली आहे. दोन्ही पोलिस ठाण्यांनी मिळून सुमारे दहा मशिन सील केल्या आहेत. नोटीस बजावण्याबरोबरच सर्व यंत्रणा सील करण्याबाबतची प्रक्रियाही पार पाडली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा गणेशाचे विसर्जन होईपर्यंत स्तब्ध होत आहेत. 

आजी- माजी नगरसेवक मुकणार विसर्जनाला 

साताऱ्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. त्यानुसार शहर व शाहूपुरी पोलिसांनी तब्बल 200 जणांना विसर्जनाचे शेवटचे तीन दिवस शहरात फिरकण्याला मनाई केली आहे. त्यामध्ये सुरुची धुमश्‍चक्री प्रकरणातील दोन्ही राजांच्या सुमारे 100 समर्थकांचा समावेश आहे. त्यामध्ये आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही ते गणपती विसर्जनाला मुकणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sound systems sealed by police department