सौंदत्ती यात्रेसाठी मानाचे जग रवाना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कोल्हापूर - उदं गं आई उदं...’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीचा कडकडाट... हिरव्या बांगड्या, ओटी व फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग फटाक्‍यांची आतषबाजी अशा धार्मिक वातावरणात गुरुवारी सौंदत्तीला रवाना झाले. 

कोल्हापूर - उदं गं आई उदं...’चा गजर, फुलांचा वर्षाव, भंडाऱ्याची उधळण... सुती, घुमकं, चौंडकं, हलगीचा कडकडाट... हिरव्या बांगड्या, ओटी व फुलांनी सजलेले श्री रेणुकादेवीचे मानाचे जग फटाक्‍यांची आतषबाजी अशा धार्मिक वातावरणात गुरुवारी सौंदत्तीला रवाना झाले. 

सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवीची यात्रा २१ रोजी आहे. या यात्रेसाठी कोल्हापुरातून मानाचे चार जग जातात. आज सायंकाळी बिंदू चौकातील गजेंद्रलक्ष्मी मंदिर येथे फुलांनी सजलेल्या जगांचे हलगीसह वाद्यांच्या गजरात नरेंद्र पायमल, अशोक पाटील आणि प्रताप जाधव यांचेकडून पूजन आणि देवीची आरती झाली. फुलांच्या वर्षावात मानकऱ्यांनी हे जग डोक्‍यावर घेतले आणि ‘उदं गं आई उदं’चा गजर झाला. जगाच्या मार्गात फुलांचा वर्षाव आणि फटाक्‍यांची आतषबाजी केली जात होती. या जगांची मिरवणूक बिंदू चौकातून आझाद चौक, उमा टॉकीज, ओढ्यावरील गणेशमंदिर मार्गे पार्वती टॉकीज येथे आली. 

येथे जगांना निरोप देण्यात आला. या यात्रेच्या काही दिवस आधीच कोल्हापुरातील भाविक सौंदत्तीला रवाना होतात. तीन दिवस आणि चार रात्री असा या यात्रेचा कालावधी असतो. यात्रा पार पडल्यानंतर चार ते पाच दिवसांनी कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका देवीची आंबील यात्रा असते.

यावेळी केराबाई कदम यांच्या जगाचे राजू कदम; ओढ्यावरील रेणुका मंदिराच्या मदनआई जाधव यांच्या जगाचे सोनाबाई जाधव; बायक्काबाई चव्हाण यांच्या जगाचे संदीप पाटील; तसेच कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष मोहनराव साळोखे, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, कार्याध्यक्ष राणी मोगले, करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष उदय पाटील, उपाध्यक्ष सुनील मोहिते उपस्थित होते.

Web Title: Soundatti Yatra special