जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी

Soybean
Soybean

काशीळ - सातारा जिल्ह्यात प्रत्येक खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ५९ हजार ५५८ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असल्याने या हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार आहे. 

कृषी विभागाकडून सोयाबीन लागवडीसाठी ५३ हजार ७५० हेक्‍टर क्षेत्र नियोजित करण्यात आले होते. खरिपात झालेल्या पेरणीत सोयाबीनची ५९ हजार ५५८ हेक्‍टर म्हणजेच ११०.८६ टक्के क्षेत्रावर लागवड झाली असल्याची नोंद झाली आहे.

सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र तब्बल पाच हजार ८०८ हेक्‍टरने वाढले आहे. अजून पेरण्या सुरू असल्याने क्षेत्रात वाढ होणार आहे. पेरणीच्या कालवधीत सोयाबीनची किमान आधारभूत तीन हजार ५० रुपयावरून यंदा तीन हजार ३९९ रुपये म्हणजे क्विंटलमागे ३४९ रुपयाने वाढली आहे. या वाढीचा परिणाम सोयाबीन क्षेत्राच्या वाढीवर होत आहे. सोयाबीन हे माण व महाबळेश्वर या तालुक्‍यांचा अपवाद वगळता जिल्ह्याच्या इतर भागांत घेतले जात आहे. सोयाबीन शेतकऱ्यांना शेतीच्या दृष्टीने उपयुक्त ठरत असून, सोयाबीनचा बिवड पुढील पिकास उपयुक्त ठरतो. उसातही सोयाबीन हे आंतरपीक घेतले जात आहे. यासारख्या कारणांमुळे सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, सोयाबीन वाढीचा फटका इतर पिकांना बसत असून, ज्वारी, कडधान्यांच्या क्षेत्रात घट झाली आहे. खरिपातील सोयाबीनची काढणी दसरा, दिवाळी या सणांच्या तोंडावर येते. या प्रमुख सणांना पैसे उपलब्ध करून देणारे हे पीक असल्यामुळे शेतकरी सोयाबीनकडे वळत असल्याने क्षेत्रावर वाढ होत आहे. 

बियाण्याचा तुटवडा 
सोयाबीनची किमान आधारभूत किमतीत ३४९ ने वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे शिल्लक राहतील, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, यादरम्यान सोयाबीन बियाण्याचा तुटवडा भासला आहे. या कालावधीत बियाणे उपलब्ध झाले असते तर यापेक्षाही सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली असती. मात्र, या हंगामात सोयाबीन बियाणे तीन ते चार हजार क्विंटल कमी उपलब्ध झाले.

तालुकानिहाय सोयाबीनचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) 
सातारा- २१८७५,  जावळी- २९०५ , पाटण- ६४४३, कऱ्हाड- १३८६९, कोरेगाव- ६०४०, खटाव- २९७२, फलटण- ५५, खंडाळा- २५५, वाई- ५१६१.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com