कास रस्त्यावरील हॉटेल्सना लगाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

सातारा - यवतेश्‍वर-कास रस्त्यावर वाढलेल्या हॉटेल्सवर तालुका पोलिसांनी लगाम लावायला सुरवात केल्यामुळे या ठिकाणी विनापरवाना चालणाऱ्या गोष्टींवर अंकुश आला आहे. त्यामुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

सातारा - यवतेश्‍वर-कास रस्त्यावर वाढलेल्या हॉटेल्सवर तालुका पोलिसांनी लगाम लावायला सुरवात केल्यामुळे या ठिकाणी विनापरवाना चालणाऱ्या गोष्टींवर अंकुश आला आहे. त्यामुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत कासचा समावेश झाल्यामुळे राज्यासह देशातील विविध ठिकाणच्या लोकांचे लक्ष कासकडे गेले. या परिसरात पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे साहजिक पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हॉटेलिंग व्यवसायालाही गेल्या काही दिवसांत भरभराटीचे दिवस आले आहेत. कासच्या हंगामाच्या व्यतिरिक्तही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या परिसरात मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स सुरू झाली आहेत. 

घरगुती मिळते जेवणही
यवतेश्‍वर घाट संपल्यापासून हॉटेलच्या रांगा सुरू होतात, ते अगदी कासपर्यंत थोड्या-थोड्या अंतरावर हॉटेल्स दिसायला लागली आहेत. हॉटेल्सबरोबर अगदी घरगुती जेवण करून देणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. मटण बरोबर नेल्यानंतर करून देणारीही हॉटेल्स आहेत. त्यामुळे प्रामुख्याने रात्रीची वेळी या हॉटेलचालकांची वर्दळ वाढते.  

कुटुंबांच्या संख्येतही वाढ
सातारा शहर व परिसरातील लोकही मोठ्या संख्येने रात्री इतर ठिकाणी जाण्यापेक्षा थंडगार हवेतचा आनंद घेत जेवणाचा आनंद लुटण्यासाठी या रस्त्यावर हमखास जात आहेत. कुटुंबांसह जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी हा परिसर झगमगाटात न्हाऊन निघत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यवतेश्‍वर घाटापासून ठिकठिकाणी वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या दिसतात. हॉटेल्सबरोबर रात्रीच्या वेळी घाटामध्ये मद्यप्राशन करायला बसणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. हॉटेल्सच्या अधिकृतपणावरही शंका व वाद आहेत. त्याबाबत महसूल विभागाची कारवाई स्वतंत्रपणे सुरू आहे. मात्र, मद्यप्राशनानंतर गेल्या काही महिन्यांत अनेकदा या परिसरात वादाचे प्रसंग निर्माण झाले होते.

पोलिसांकडून कार्यवाही...
 सातारा तालुका पोलिसांनी वाढवली गस्त  
 नियमांचे पालन करण्याच्या नोटिसा
 पार्किंग व्यवस्था करण्याचे आदेश 
 बेकायदेशीर कामे बंद करण्याचे निर्देश
 विहित वेळेत हॉटेल बंद करण्याच्या सूचना

‘एसपीं’च्या नजरेतून...
या परिसरातून फेरफटका मारत असताना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या नजरेतूनही हे चित्र सुटले नाही. त्याचबरोबर भविष्यात यामुळे निर्माण होऊ शकणारे वादावादीचे प्रसंग, अपघात याचीही त्यांना जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप जाधव यांना दिले. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून तालुका पोलिस सतर्क झाले आहेत. त्यापूर्वीच संबंधित हॉटेलचालकांना नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईला सामोरे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

व्यवसायांवर परिणाम शक्‍य
पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे या परिसरातील हॉटेलचालकांचे धाबे दणाणले आहेत. अशा पद्धतीने जर कारवाई सुरू राहिल्यास धंद्यांवर परिणाम होऊन हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या परिसरात अशांतता निर्माण होण्यापासून रोखली जाणार आहे. ती तशीच कायम राहणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हॉटेल चालकांनीही आवश्‍यकत्या उपाययोजना करणे महत्त्वाचे बनले आहे.

Web Title: SP action on hotel on kas road