'डी.बी. पथकाने काय दिवे लावले ते तपासा'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील डी.बी. पथकाने काय दिवे लावले ते तपासा. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कामाचा आढावा घ्या. निष्क्रियांना तातडीने तेथून हटवा. याचा आठ दिवसांत अहवाल सादर करा, अशा कडक सूचना सर्व पोलिस उपाधीक्षकांना पोलिस अधीक्षक महादेव ताबंडे यांनी दिल्या. 

कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील डी.बी. पथकाने काय दिवे लावले ते तपासा. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याच्या कामाचा आढावा घ्या. निष्क्रियांना तातडीने तेथून हटवा. याचा आठ दिवसांत अहवाल सादर करा, अशा कडक सूचना सर्व पोलिस उपाधीक्षकांना पोलिस अधीक्षक महादेव ताबंडे यांनी दिल्या. 

पोलिस अधीक्षक कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पोलिस अधीक्षक तांबडे यांनी घेतली. दीर्घकाळ चाललेल्या या बैठकीत पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या (डी.बी.) कार्यक्षमतेवर तांबडे यांनी अग्रक्रमाने चर्चा केली. मटक्‍यासह वाढत्या अवैध धंद्याबाबत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. प्रत्येक पोलिस ठाण्यात डी.बी. पथक आहे. ठाण्याची हद्द जेमतेम ६ ते ३० कि.मी. आहे. येथील रेकॉर्डवरील अगर गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधितांची माहिती प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला असते. तरीही गुन्हेगारांवर वचक अगर अवैध धंद्याचा बीमोड होऊ शकत नाही. मटका अड्ड्याचा पर्दाफाश करण्यासाठी अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाला छापा टाकावा लागतो. याची पुसटशीही माहिती संबंधित पोलिस ठाण्यातील डी.बी. पथकाला नसावी याबाबत तांबडे यांनी खंत व्यक्त केली. 

जिल्ह्यातून मटका, जुगार अड्डेच नव्हे; तर सर्व अवैध व्यवसाय हद्दपार झाले पाहिजेत. त्यासाठी पोलिस उपअधीक्षकांनी तातडीने सर्व पोलिस ठाण्यातील डी.बी. पथकाची तपासणी करावी. त्यांनी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आतापर्यंत काय दिवे लावलेत याची माहिती घ्यावी. प्रत्येक कर्मचाऱ्याची गुणवत्ता तपासावी. जे कर्मचारी वशिल्याने वर्षानुवर्षे डी.बी. पथकात ठाण मांडून आहेत आणि जे निष्क्रिय आहेत, त्यांना तातडीने पथकातून काढून टाका. गरज वाटेल तेथे नवी डी.बी. पथके तयार करा. याबाबतचा अहवाल येत्या आठ दिवसांत म्हणजेच १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे तांबडे यांनी सर्वच पोलिस उपाधीक्षकांना दिले.

जिल्ह्यातील ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका सुरू असेल, त्या पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. याचाच भाग म्हणून जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याचे भान सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी ठेवावे, असेही तांबडे यांनी सूचित केले. 

डी.बी. पथकाची कामगिरी समाधानकारक नसेल तर ठोस पावले उचलण्यात येतील. पोलिस उपअधीक्षकांकडून सादर होणाऱ्या अहवालातून पथकांचा लेखाजोखा समोर येईल. याबाबत १६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आढावा बैठकीत निर्णय घेऊ.
- महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक

Web Title: sp Mahadev tambde