अवकाश निरीक्षणगृह मार्च अखेर होणार सज्ज 

परशुराम कोकणे 
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

सोलापुरात अवकाशप्रेमींच्या मागणीनंतर शासनाने स्मृतिवन उद्यानात लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक असे अवकाश निरीक्षणगृह उभारण्यात आले. काही महिन्यांतच देखभालीअभावी अवकाश निरीक्षणगृह बंद पडले.

सोलापूर : स्मृतिवन उद्यानातील अवकाश निरीक्षणगृह देखभाल, दुरुस्तीअभावी बंद पडले होते. अवकाशप्रेमींच्या पाठपुराव्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अवकाश निरीक्षणगृहातील दुर्बीण व इतर साहित्याची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. दुर्बिणीला कॅमेरा लावून मोठ्या स्क्रीनवर गृह, तारे दाखविण्यात येणार आहेत. मार्च महिनाअखेरपर्यंत अवकाश निरीक्षणगृह लोकांसाठी खुले होणार आहे. 

सोलापुरात अवकाशप्रेमींच्या मागणीनंतर शासनाने स्मृतिवन उद्यानात लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक असे अवकाश निरीक्षणगृह उभारण्यात आले. काही महिन्यांतच देखभालीअभावी अवकाश निरीक्षणगृह बंद पडले. अवकाश अभ्यासक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर, सचिन जोग यांनी दुर्बिणीची दुरुस्ती व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे पाठपुरावा केला. सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने यांनी यासाठी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध केला आणि दुर्बीण दुरुस्त करून घेतली. अवकाश निरीक्षणगृहासाठी स्वयंसेवक उपलब्ध व्हावेत, यासाठी काही दिवसांपूर्वी अवकाशप्रेमींची कार्यशाळाही घेण्यात आली आहे. 
अवकाश निरीक्षणगृह सुरू करण्यासाठी योग्य प्रक्रिया करावी लागणार आहे, म्हणून थोडासा वेळ लागतोय. लोकांसाठी ते प्रत्यक्ष मार्चअखेरपर्यंत सुरू होईल, असे वनअधिकारी सुवर्णा माने यांनी सांगितले. 

अवकाश निरीक्षणगृहात येणाऱ्या प्रत्येकाला दुर्बीण हाताळणे अवघड आहे, त्यामुळे दुर्बिणीला कॅमेरा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वांना ठळकपणे अवकाशातील हालचाली पाहता येणार आहेत. मार्च महिनाअखेरपर्यंत अवकाश निरीक्षणगृह सर्वांसाठी खुले होईल. 
- सुवर्णा माने, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण

Web Title: Space inspection will be ready by the end of March