स्पेनची तरुणी झाली 'या' गावची सून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

शिराळा तालुक्‍यातील आसवलेवाडी येथे हा विवाह सोहळा झाला. स्पेनची मुलगी नागोरी लुईस चवारी आणि कोकरूड पैकी माळेवाडी येथील धनराज शामराव गमे विवाह बंधनात अडकले. स्पॅनिश पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.

कोकरूड - शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील डोंगरी भागातील कोकरूडपैकी माळेवाडी येथे आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा रंगला. भारतीय पाहुणचाराने स्पॅनिश पाहुणे भारावले. सोहळ्यानिमित्त नातेवाईक व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. 

शिराळा तालुक्‍यातील आसवलेवाडी येथे हा विवाह सोहळा झाला. स्पेनची मुलगी नागोरी लुईस चवारी आणि कोकरूड पैकी माळेवाडी येथील धनराज शामराव गमे विवाह बंधनात अडकले. स्पॅनिश पाहुण्यांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.

पाहूणचाराने पाहूणे भारावले

आसवलेवाडीतील आचल मल्टीपर्पज येथे विवाह सोहळा झाला. 
सहा नोव्हेंबरला स्पेनचे पाहुणे लग्न सोहळ्यासाठी कोकरूड येथे आले. त्यांनी कोकरूड परिसर पाहून घेतला. गोऱ्या पाहुण्यांमुळे अनेकांना आश्‍चर्य व कौतुक वाटले. काहींनी संवादाचा प्रयत्नही केला. भाषेच्या अडचणीमुळे अडचण झाली. पाहुण्यांनीही मात्र स्वागत हसतहसत स्वीकार केला. कोकरूड, चांदोली परिसर चार दिवस पिंजून काढला. मनसोक्त फोटोग्राफीही केली. 

आठ नोव्हेंबरला मेहंदी कार्यक्रम झाला. 9 नोव्हेंबरला हळदी लागल्या. स्पॅनिश पाहुण्यांचा उत्साह ओसंडला होता. त्यांनी अनेकांना मेहंदी लावली. कार्यक्रम पाहून ते भारावले. 
रविवारी सकाळपासून लग्नाची धामधूम सुरू होती. पाहुणे उत्साही होते. खास करून महिलांनी भारतीय साड्या परिधान केल्या होत्या. भारतीय पोशाखांचे त्यांनी कौतुक केले. स्पॅनिश पाहुण्यांना पाहण्यास आलेल्यांनी सेल्फीचा आनंद लुटला.

मुलीने घेतलेला निर्णय स्तुत्य

वधू नागोरीने मात्र कमी बोलणे पसंत केले. तिची आई जुलिया व वडील लुईस चवारी म्हणाले,""मुलीने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. तिला शुभेच्छा. तिचे पती व घरचे आणि गावकरी मुलीचा चांगला सांभाळ करतील यावर विश्वास आहे.'' 

चार वर्षांपूर्वी धनराज गमे नोकरीनिमित्त इंग्लंडला गेला होता. त्यावेळी नागोरी स्पेनमधून तिथे शिक्षणासाठी आली होती. तेथेच त्यांची ओळख झाली. नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. 

दरम्यान, वर्षांपूर्वी ते दोघेही कोकरूड येथे आले. नागोरीचे आई-वडील बरोबर होते. भारतीय संस्कृतीनुसार विवाह व्हावा, असा त्यांचा निर्णय झाला. ते नातेवाईकांबरोबर कोकरूड येथे आले. त्यांच्यासह राचीओ, मारिसोल, आलबेरतो, रूबेन, रिकार्डो, एल्सा, नारिया, बेलेन, इराटी, जुलीया, सारा, मारिया आणि मार्कोस आदी आहेत. आंतरराष्ट्रीय म्हणता येईल असा या विवाह सोहळ्याला नवरदेव धनराज व नवरी मुलगी नागोरी लुईस चवारी आणि नातेवाईक उपस्थित होते.  

अशाही बातम्या

अरेच्चा ! कोल्हापुरातून भिकारी झाले गायब

Photo :  मधुबनी चित्रशैली आहे तरी काय ?

गडहिंग्लजला तालुका अध्यक्षपदावरून ‘राष्ट्रवादी’त मतभेद? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Spain Girl And Shirala Boy Marriage In Aswalewadi