संविधानाच्या प्रबोधनासाठी येथे राबविला जातो 'हा' अनोखा उपक्रम

  नागेश गायकवाड       
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

समाजातून अनेकांची मदत होते...
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्यावतीने संविधान जनजगृती सप्ताह घेतो. कार्यक्रमासाठी समाजातून अनेकांची मदत होते.या उपक्रमातून संविधानाबाबतची माहिती लोकांना मिळते.समाज जागृती होते.देशहिताचे कार्य आम्ही करीत आहोत.-
राजेंद्र खरात(अध्यक्ष -फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच.आटपाडी)   

आटपाडी ( सांगली ) : महाराष्ट्रात गावोगावी विविध ग्रंथांचे वाचन केले जाते. पारायणे आणि सप्ताह अनेक वर्षांपासून केले जात आहेत. पण दुष्काळाचा शाप बसलेल्या आटपाडीत मात्र संविधानाच्या प्रबोधनाची चळवळ राबवली जाते.  गेली पाच वर्षे भारतीय संविधान जनजागृती सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात मोठे प्रबोधन केले जाते. येथे फुले - शाहू - आंबेडकर विचार मंचाकडून दरवर्षी सात दिवस विविध कार्यक्रम आणि व्याख्याने घेऊन संविधान सप्ताह आयोजित केला जातो.

इतिहास काळापासून गावागावात धार्मिक ग्रंथांच्या पारायणाचे सप्ताह होतात. याच धर्तीवर देशाची कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या संविधानाबद्दल जनजागृती व्हावी, या हेतूने अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या फुले - शाहू - आंबेडकर विचारमंचाने हा उपक्रम राबवला आहे.

आटपाडीतील घराघरात संविधान पुस्तिका

येथील राजारामबापू विद्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 वेळेत घेतला जातो. सप्ताहाची सुरुवात 20 नोव्हेंबर रोजी संविधानाच्या ग्रंथदिंडीने होते. गावातुन ग्रंथदिंडी काढली जाते. सप्ताहात संविधान व संविधानाशी निगडित विषयावर सहा दिवस सहा वेगवेगळे वक्ते प्रबोधन करतात. वक्त्यांना संविधानाची पुस्तिका भेट देऊन स्वागत सत्कार केला जातो. मान्यवरांसह श्रोत्यांनाही लहान स्वरूपातील संविधान पुस्तकाचे वाटप केले जाते. हजारोच्या संख्येने वाटप केल्यानेच आटपाडीतील घराघरात संविधान पुस्तिका पोहचली आहे. पाच वर्षात 30 हुन अधिक वक्त्यांनी हजारो नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे नागरिकांत संविधानाबद्दल जनजागृती झाली आहे.

समाजातून अनेकांची मदत होते...
फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्यावतीने संविधान जनजगृती सप्ताह घेतो. कार्यक्रमासाठी समाजातून अनेकांची मदत होते. या उपक्रमातून संविधानाबाबतची माहिती लोकांना मिळते. समाज जागृती होते. देशहिताचे कार्य आम्ही करीत आहोत.

- राजेंद्र खरात,अध्यक्ष -फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच.आटपाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Special Event For Awakening The Constitution In Aatpadi