संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती

संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती

कोल्हापूर - संशयित खासगी सावकारांच्या घरांची आता सहकार खात्याच्या मदतीने झडती घेतली जाईल. त्यात तारणापोटी घेतलेली आक्षेपार्ह कागदपत्रे, कोरे धनादेश असे प्रकार आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे दिला. संघटित गुन्हेगारी व अवैध धंदे मोडून काढण्यासाठी पोलिसांची मोहीम अखंडित सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

चौकात दोन-चार जणांचे टोळके जमा होते. बघता बघता त्याची गॅंग तयार होते. अशी गॅंग मटका, जुगार अशा अवैध धंद्यासह खासगी सावकारीत सक्रिय होत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे आता चौकाचौकांत जमा होणाऱ्या टोळक्‍यांवरच पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. खासगी सावकारांच्या कर्जातून नवविवाहितेवर अत्याचाराचा घडलेला प्रकार पंधरा दिवसांपूर्वी पुढे आला. खासगी सावकारांकडून अवैधरीत्या कर्जाची वसुली केली जाते.

दहशतीमुळे त्यांच्याविरोधात सहजासहजी तक्रार देण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे ते पोलिस रेकॉर्डवर येत नाहीत. खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी आता सहकार खात्याची मदत घेतली जाणार आहे. ज्या खासगी सावकारांविरोधात थेट तक्रार किंवा निनावी तक्रार येईल, अशा सावकारांच्या घराची थेट सहकार खात्याच्या मदतीने घरझडती घेतली जाणार आहे. त्यात गैरप्रकार अढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे डॉ. वारके यांनी स्पष्ट केले. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुखही उपस्थित होते. 

काही सावकारांवर लवकरच कारवाई
मटका, जुगार अड्डे चालविणाऱ्यांसह गुंडांवर मोकाअंतर्गत कारवाईची धडक मोहीम पोलिस प्रशासनाने हाती घेतली आहे. आता त्यांनी खासगी सावकारी मोडून काढण्यासाठी पोलिस दल आक्रमक झाल्याचे संकेत विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. वारके यांनी दिले. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी सावकारांचे दाबे दणाणले आहेत. काही सावकारांविरोधात निनावी तक्रारी आल्या असून त्यांची लवकरच घरझडती घेतली जाण्याची शक्‍यता आहे. 

अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाईची मोहीम सुरूच राहणार...
दरम्यान, यादवनगरातील मटका अड्ड्यावर पोलिसांच्या छाप्यावेळी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरवात केली. काळ्या धंद्यांशी संबंधित असणाऱ्या व्हाईट कॉलर म्होरक्‍यांचा शोध सुरू आहे. त्यांना पोलिस रेकॉर्डवर आणले जात आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अढळून आले, अशा परिक्षेत्रातील सात ते आठ अधिकाऱ्यांवर बदली आणि वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्यात आली असल्याचे डॉ. वारके यांनी सांगितले. 

गुटखा कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाची मदत घेणार...
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर गुटखा तस्करी केली जाते. त्यावर रोख लावण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याबाबत कारवाईचे अधिकार हे अन्न व औषध प्रशासनाकडे असल्याने या कारवाईत त्यांना सक्रिय करून घेऊ, असे डॉ. वारके यांनी सांगितले.

तेलनाडेसह इतरांची माहिती घेण्याचे काम सुरू 
इचलकरंजीतील संशयित नगरसेवक संजय तेलनाडेसह मटका व्यवसायाशी संबंधितांची यापूर्वी दाखल गुन्ह्याची व पोलिसांनी केलेल्या तपासाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार लवकरच पुढील कारवाई केली जाईल, असे डॉ. वारके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com