#Specialtyofvillage गणेशवाडीच्या शिवाराला कोथिंबिरीचा सुगंध

#Specialtyofvillage  गणेशवाडीच्या शिवाराला कोथिंबिरीचा सुगंध

करवीर तालुक्‍यातील गणेशवाडी अवघ्या २५०० लोकवस्तीचं. केवळ कोथिंबीर पिकवून हे गाव सधन झाले. दरातील चढऊतार, अल्प जमीन असूनही ग्रामस्थांनी कोथिंबीर पिकवायचे थांबवले नाही. हंगामात गावातून दररोज २० ते २५ हजार पेंढ्या बाजारात जातात. 

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांनी उसासह भाजीपाला घेऊन २० ते ३० वर्षांत प्रगती साधली आहे. यांपैकीच एक गणेशवाडी. एक ते दहा गुंठ्यांत कोथिंबीर पिकविणारे शेतकरी गावात आहेत. आज गाव कोथिंबीर उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहे. जिद्द, चिकाटी आणि राबण्याची वृत्ती ग्रामस्थांच्या नसानसात भिनलेली आहे. येथे कोथिंबिरीची वार्षिक उलाढाल साधारणतः कोटीच्या घरात असते. सुमारे ६० एकरांवर कोथिंबीर घेतली जाते.

प्रगतीची ५० वर्षे 
१९६५ पर्यंत गावातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. १९६६ मध्ये ग्रामस्थांनी स्वनिधीतून भावेश्वरी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. तुळशी नदीवरून पाईपलाईन गावात आणली. पैसे कमी पडले म्हणून महिलांनी दागिने गहाण ठेवले होते, असे संस्थापक गंगाराम माने सांगतात. योजनेसाठी माजी आमदार दिनकरराव मुद्राळे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामस्थ त्यांचे उपकार विसरलेले नाहीत.

१९८५ च्या दरम्यान गणपती धोंडी माने यांनी कोथिंबीर घेण्यास सुरवात केली. उत्पादन समाधानकारक नव्हते. धन्याची उगवण लवकर व चांगली व्हावी म्हणून त्यांनी पेरलेल्या बोधावर उसाचा पाला अंथरला. अशा प्रयत्नातून कोथिंबिरीची प्रत वाढून चांगली अर्थप्राप्ती झाली. आज संपूर्ण गाव ही पद्धत अवलंबत आहे. पूर्वी मार्चपासून जूनच्या १५ तारखेपर्यंत कोथिंबीर घेतली जायची; पण अलीकडे ऑगस्टपासूनही काही शेतकरी कोथिंबीर घेतात आणि भरपूर पैसे कमावतात. गुंठ्याला दोन किलो धने लागतात. त्यामध्ये साधारण तीनशे पेंढ्या निघतात. पेंढीला पाच रुपये भाव पकडला तर गुंठ्याला १५०० रुपये, दहा गुंठ्यांत १५ ते २० हजार महिन्यात मिळतात. अशी पिके वर्षभरात सहा ते सात महिने घेतात. अन्य पिकांच्या तुलनेत खर्चही कमी येतो. त्यामुळे नफ्याचे गणित चांगले साधते.

पैरा पद्धतीने शेती
एखाद्या शेतकऱ्याकडे शेत आहे; पण पाणी नाही आणि दुसऱ्याकडे पाणी आहे; पण शेत कमी आहे असे शेतकरी एकमेकांशी पैरा पद्धतीने कोथिंबीर पीक घेतात. त्यानुसार व्यवहार ठरतो. निम्मे ते एक चौथाई भाग देऊन व्यवहार करतात.

नियोजन 
कोथिंबीर घेताना अनेक गोष्टी काटेकोरपणे पाळल्या जातात. पेरणीनंतर वाफ्यावर सर्वत्र उसाचा वाळलेला पाला अंधरला जातो. गरजेनुसार तीन ते चार दिवसांनी पाणी दिले जाते. सातव्या ते आठव्या दिवशी पाला पूर्णपणे वेचून काढला जातो. यावेळी पूर्ण उगवण झालेली असते. वाढीनुसार हलकासा युरिया दिला जातो. एक- दोन वेळा टॉनिक व कीटकनाशक फवारले जाते. साधारण ३० व्या दिवशी कोथिंबीर काढली जाते. कोथिंबीर गोवा, कणकवली, कुडाळ, कऱ्हाड, रत्नागिरी आदी गावांतील युवक घेऊन जातात. जास्तीत जास्त कोथिंबीर कोल्हापूर मार्केटमध्ये पाठविली जाते. या पिकाच्या जिवावर आम्ही मोठे झालो अशी भावना ग्रामस्थांतून आहे. अलीकडे बहुतांश शेतकरी झेंडूतूनही भरपूर पैसे कमावत आहेत. काही शेतकरी बाहेरच्या गावांत जाऊन पिके पैरा पद्धतीने करत आहेत. गेली दोन वर्षे शेतमालाला दर मिळत नाही, म्हणून अडचणीही वाढल्या आहेत.

गेल्या दहा-बारा वर्षांत गावाचे स्वरूप पालटलेले दिसत आहे. जुन्या दगडमातीच्या घराच्या जागी सिमेंट काँिक्रटची घरे व बंगले झाले आहेत. आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. पिकावरील निष्ठाच यासाठी कारणीभूत आहे.
- नामदेव पौंडकर, 

तरुण शेतकरी 

सौद्याची पद्धत अमान्य
रामचंद्र नारू माने आता ऐंशीत आहेत. ते म्हणाले, ‘‘मी आजपर्यंत स्वतःचा माल स्वतःच मार्केटमध्ये जाऊन विकला. मला सौद्याची पद्धत मान्य नाही. आम्ही माल पिकवायचा आणि एका क्षणात मिळेल ती किंमत घेऊन घरी परतायचे, हे मला पटत नाही. स्वतःच्या फायद्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी वेळ दिला पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com