#Specialtyofvillage पुजाऱ्यांचे गाव जोतिबा डोंगर

#Specialtyofvillage पुजाऱ्यांचे गाव जोतिबा डोंगर

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरातमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे दख्खनचा राजा श्री जोतिबा देव. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ९० टक्के लोक पुजारी (गुरव) समाजाचे आहेत. ते डोंगरावर येणाऱ्या भाविकांचा कुलाचार विधी करतात. वावर जत्रा, घुग्गुळ, देवदर्शन, अभिषेक, नैवेद्य, नवस आदी विधी पारंपरिक पद्धतीने करून भाविकांची सेवा करतात.

जोतिबा डोंगरावरील पुजारी आणि भाविकांचा अनोखा ऋणानुबंध आहे. देवाच्या सेवेबरोबरच भाविकांची सेवा यात या पुजाऱ्यांचा दिवस उगवतो आणि मावळतो. फक्त पुजारीच नव्हे तर अख्खे कुटुंब या सेवेत मग्न असते. स्वतःचे सुख आणि दुःख क्षणभर बाजूला ठेवून जोतिबाच्या भक्तीत तल्लीन होणारी ही मंडळी जोतिबा डोंगराचे वैभवच आहे. 

जोतिबा डोंगरावरील मूळ उंबरठा १५०० होता. त्याची विभागणी होत तो तीन हजारांवर गेला आहे. पुजारी समाजातील मूळ आठवडा खातेदार ३६३ असून, पोटखातेदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. आठवडा पद्धतीनुसार प्रत्येक पुजाऱ्यास मंदिरात सेवा करण्याची संधी मिळते. याचा प्रारंभ सोमवारी तर सांगता रविवारी असते. पुजाऱ्यांची काकड आरती, पाद्यपूजेपासून शेजारतीपर्यंत ही धावपळ सुरू असते. रात्री अकराला बंदीचा कर्णा होतो आणि चारही दरवाजे बंद होता. त्यावेळी पुजाऱ्यांचा दिवस मावळतो. जबाबदार पुजारी मंदिरातच रात्रीची विश्रांती घेतो. 

भाविक मध्यरात्री डोंगरावर आला तरी त्याची भाजी-भाकरी ते निवासापर्यंतच्या व्यवस्था केली जाते. त्यात घरातील महिलांचा पुढाकार असतो. निरपेक्ष वृतीने पुजारी कुटुंबातील महिला त्यासाठी राबत असतात. पुजारी व भाविक यांचे नाते कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आहे. हे पुजारी भाविकांच्या घरी गेल्यावर भाविक सडा रांगोळी घालून त्यांचे स्वागत करतात, देवासारखा सन्मान करतात. प्रत्येक धार्मिक कार्यक्रमास पुजाऱ्यांना निमंत्रण दिले जाते.

जोतिबा मंदिरात दररोज श्रींच्या तीन वेळा पूजा बांधल्या जातात. पहिली साधी - सकाळी अभिषेकापूर्वी, दुसरी खडी - अभिषेकानंतर, तिसरी बैठी महापूजा दुपारच्या अभिषेकानंतर. महापूजा बांधण्यात येथील पुजाऱ्यांचा हातखंडा आहे. या पूजा ज्या-त्या दिवसाचे महत्त्व, पंरपरा यांना समोर ठेवून बांधल्या जातात. महाराष्ट्रात इतर देवालयात या पुजाऱ्यांना महापूजा बांधण्यासाठी आंमत्रित केले जाते. आकर्षक फेटे बांधण्यामध्ये येथील पुजारी तरबेज आहेत. काही तरुण उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यामध्ये केदार बुरांडे जिल्हाधिकरी आहेत. सांगळे पोलिस उपनिरीक्षक आहेत. काही तरुण सैन्य तर काही पोलिस दलात आहेत. काही वकील, डॉक्‍टर आहेत; मात्र देवाच्या सेवेशी असलेली नाळ कधीही त्यांनी तुटू दिलेली नाही. 

गावकर परंपरा
गावात प्रमुख दहा भावकी आहेत. या भावकींमधील एका प्रमुख व्यक्तीला गावकर पद दिले आहे. ही व्यवस्था शाहू महाराज यांनी केली आहे. त्याच परंपरेचे आजही पालन होते. प्रमुख गावकर चार दरवाजांतील व्यवस्था, नित्य कार्यक्रम, उत्सव, अडचणी या संदर्भात देवस्थान समितीशी संवाद करतात. गावकरांचा निर्णय मान्य असतो. कारण खुल्या संवादात असल्याचे गावकर (पुजारी) शंकरराव दादरणे यांनी सांगितले.

यात्रा पुजाऱ्यांच्या सहकार्यामुळेच होतात. भाविकाचे पुजाऱ्यांशी नाते जोडलेले आहे. ते गावी येतात. त्यावेळी त्यांना देवासारखा मान देतो. आम्ही जोतिबावर जातो; तेव्हा पुजाऱ्यांकडून कुटुंबातील सदस्यांसारखीच वागणूक मिळते.
- आर. आर. पाटील, 

उपविभागीय पोलिस अधिकारी, शाहूवाडी विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com