#Specialtyofvillage केर्ले इथं दगडाला दिलं जातं देवपण !

#Specialtyofvillage केर्ले इथं दगडाला दिलं जातं देवपण !

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरचं करवीर तालुक्‍यातलं केर्ले गावात गेला की तुम्हाला अखंड ‘ठॉकऽऽ, ठॉकऽऽ’ असा नाद कानी पडतो. थोडे पुढे गेलात की तुम्हाला सुबक मुर्तींचे भांडारच आढळून येते. दगडातून साकारलेल्या अनोख्या कलाकृती पाहून तुम्ही देहभान हरपून जाता. काळ्या दगडातून घडविलेल्या या मूर्ती तुम्हाला वेगळाच आनंद देऊन जातात.

मिरजेहून शहाबुद्दीन मुल्लाणी यांचे वडील १९६० च्या दरम्यान मोलमजुरीसाठी केर्लेत आले. गवंडी कामाबरोबरच शहाबुद्दीन यांनी घरासाठी दगडी फाडी, घडीव चौकटींची निर्मिती सुरू केली. देवदेवतांची छायाचित्रे पाहून १९६५ मध्ये एक दगडी मूर्ती तयार केली. ती ग्रामस्थांना खूपच आवडली. लोकांनी त्यांना तुळशी वृदांवन, हनुमान, गणपती आदींच्या मूर्ती घडविण्यास सांगितले आणि तेही तन्मयतेने घडवू लागले. दगडावर हातोडा छन्नीचे घाव बसू लागले आणि त्यातून दगडाला देवपण येऊ लागले.

१९७० च्या काळात केर्लेत शहाबुद्दीन यांचा एकच दगडी कारखाना होता. त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांनी शिल्पकला शिकून बारा कार्यशाळा सुरू केल्या आहेत. त्यातूनच गावाची ‘दगडाला देवपण देणारे गाव’ अशी ओळख निर्माण झाली. तुळशी वृंदावनाची किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीचे छायाचित्र देऊन प्रतिकृती बनविण्यासही सांगतात.

सुबक नि टिकावू दगडी मूर्तींसाठी फक्त काळा पाषाण लागतो. तो जोतिबा डोंगर तसेच टोप परिसरातील खाणीतून आणला जातो. पाहिजे त्या मापाचा, आकाराचा दगड निवडून कार्यशाळेत आणून छन्नीचे घाव घालून सूबक मूर्तींत किंवा पुतळ्यात रूपांतर केले जाते. येथील मूर्तिकाराचे कसबी हात आणि तीक्ष्ण नजरेतून बारकावे शोधत काम करतात. चुकीने छन्नीचा घाव जोरात बसला तर मूर्तीला बेढबपणा येतो. हे टाळण्यासाठी हळुवार घाव घातले जातात.

मूर्तीचे दर इंचावर ठरतात. प्रति इंच दर ७०० पासून ते कलाकुसरीनुसार तीन हजार रुपयांपर्यत असतो. अगदी सात इंचापासून ते साडेपाच फुटांपर्यंत मूर्ती येथे घडवितात. चौघे कारागीर महिनाभर राबून तीन ते चार मूर्ती घडतात. काम जोखमीचे असल्याने कामगारांचा रोजगाराचा दर दिवसा किमान हजार रुपये असतो. 

मूर्ती कार्यशाळांचे जनक शहाबुद्दीन मुल्लाणी यांची तिसरी पिढी आता व्यवसायात आहे. त्यांचा मुलगा इसाक सिव्हिल इंजिनिअर आहे, तर नातू अचल कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. दोघेही परंपरांगत व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी हिरीरीने सहभागी होत आहे. मुस्लिम बांधव असले तरी त्यांनी हिंदू देव-देवतांसह पौराणिक, प्राचीन इतिहासाचा उत्तम अभ्यास केला आहे. इसाक यांना आपल्या दारापुढे घडविलेल्या गणपतीची मूर्ती नित्य पूजा-अर्जा करतात.

यांत्रिकीकरणाने वेळेची बचत
पूर्वी हातोडा, छन्नी हिच प्रमुख हत्यारे होती. त्यामुळे मूर्ती घडवायला सहा-सहा महिने लागायचे; पण आता ग्राईंटर, विविध प्रकारची फिनिशिंग यंत्रसामुग्रीमुळे दोन-तीन महिन्यांचे काम महिन्याभरात होते.

बी बिग यांचे शिल्प कोरणार
इसाक मुल्लाणी अमिताभ बच्चन यांचे फॅन. बिग बीच्या छायाचित्रांचा त्यांच्याकडे संग्रह आहे. त्यांच्या प्रेमापोटी ‘कोन बनेगा करोडपती’ बच्चन यांची प्रतिकृती तेथील सेटसह दगडी स्वरूपात कोरणार आहेत. ते शिल्प कारखान्यात ठेवणार आहेत.

कोटींत उलाढाल
बाराही महिने येथे काम चालते. मूर्तीचा दर इंचावर असल्याने एक फूट उंचीच्या मूर्तीचा दर दहा हजार रुपये तर पाच फूट उंचीच्या मूर्तीचा दर लाखाच्या घरात जातो. त्यामुळे वर्षाकाठी कोटींत उलाढाल होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com