#Specialtyofvillage लाखो रुपयांचे माठ विकणारे वारनूळ

सतीश माळवी
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर, सांगली, बेळगाव आणि काेकणात वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जपणारी आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अनेक गावं आहेत. अख्ख्या जगात ‘गाव माझं वेगळं’ असं अभिमानानं मिरविणाऱ्या या आगळ्यावेगळ्या गावांविषयी ‘हटके’ माहिती देणारी ही मालिका...

‘वारनूळ’ माठ आता महाराष्ट्रासह कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. त्यामागे इथल्या कुंभार बांधवांचे कसब आहे. गावात कुंभार समाजाचा चाळीसभर उंबरा. त्यातील जवळपास २०० प्रौढ स्त्री-पुरुष माठ निर्मितीत आहेत. डिसेंबर ते मे या सहा महिन्यांत सुमारे ८० लाखांची उलाढाल होते. येत्या दोन वर्षांत माठ कोटीचे उड्डाण घेईल.

कळे-काटेभोगाव सोडल्यानंतर उजव्या हाताला वारनूळची स्वागत कमान लागते. ग्लिरिसिडियाच्या झाडांनी आच्छादलेल्या आडीच्या डोंगरपायथ्याने, डांबर बेपत्ता झालेल्या नागमोडी रस्त्याने अडीच किलोमीटरवर येते सुजलाम्‌ सुफलाम्‌ गाव वारनूळ. कासारीच्या वरदहस्तानं गावाचं ९५ टक्के क्षेत्र बागायती. 

येथील कुंभार समाज दहा पिढ्यांपासून माठनिर्मितीत आहे. उत्तम चिकनमाती, चुलींसह गुऱ्हाळातील राख, रस्त्यावरची धूळ, जळण, उसाचा वाळलेला पाला, गोवऱ्या (शेणी), कवळे (खुरट्या झुडपांच्या बारीक फांद्यांचे भारे) आदी माठ निर्मितीतील कच्च्या मालाची गावपांढरीतच होणारी मुबलक उपलब्धता आणि कुंभार समाजबांधवांचे कसब यामुळे माठनिर्मितीचा व्यवसाय येथे वर्षानुवर्षे सुरू आहे. माठांतील सच्छिद्रतेसाठी अत्यावश्‍यक लीद मात्र इचलकरंजी, कऱ्हाड, सातारा, सांगली, मिरज, पन्हाळा येथून दिवसागणिक बदलणाऱ्या दराने घ्यावी लागते.  

पाणीसाठवण क्षमतेनुसार एक, दोन, तीन व चार अशा वर्गवारीनुसार माठ बनविले जातात. स्त्री-पुरुषाची एक जोडी रोज वेगवेगळ्या आकारांचे सुमारे २५ ते ३० माठ बनविते. एक क्रमांकाच्या माठासाठी कमी-अधिक वस्तुमानाचे चिखलाचे गोळे बनविले जातात. दररोज सकाळी सातच्या सुमारास फिरत्या चाकावर माठ बनविण्यास सुरवात होते. लय पकडलेल्या गतिमान चाकांवर गोळ्यांना कारागिरांचा अंगठा आणि बोटांच्या नजाकतदार स्पर्शाने देखणे माठ तयार होत राहतात. सर्वच माठांना काव (नैसर्गिक लाल रंग) देऊन ते सावलीत वाळवतात. सलग आठ दिवसांत सुमारे ३०० ते ३५० कच्चे माठ तयार होतात. 

चांगले वाळलेले माठ भट्टीत भाजतात. भाजल्याने माठांना काळा व तांबडा रंग येतो. काळ्या माठांना बाजारात अधिक मागणी असते; पण कष्टाच्या प्रमाणात मोबदला नसल्याने तांबड्या माठांची निर्मिती करण्याकडे बहुतेकांचा कल आहे. 
जानेवारी-फेब्रुवारीत गावातून रोज सरासरी पाच हौदा टेम्पो, तर मार्चपासून रोज १२ ते १५ हौदा टेम्पो माल (एका टेम्पोत लहान-मोठे ३५० माठ मावतात) कोल्हापूरसह संपूर्ण कोकण, बेळगाव, धारवाड, कारवार, सांगली, मिरज, सोलापूर भागात पाठविले जातात. बहुसंख्य कारागिरांकडे व्यापारी येऊन माल खरेदी करून नेतात. 

मी व्यवसायाला सुरुवात केली; तेव्हा नफा पाच-दहा पैशांत होता. आता मिळकत होते; परंतु उत्पादन खर्चही वाढला आहे. दर्जा टिकवून ठेवल्याने वारनूळ माठ हा ब्रॅंड बनला आहे. 
- कुंडलिक कुंभार,
वारनूळ 

असा ठरतो माठाचा नंबर! 
क्रमांक     पाणी धारकतेची क्षमता     दर रुपयात
एक      तीन घागरी     ९०
दोन    दोन घागरी      ७०
तीन     एक घागर     ५०
चार     तीन लिटरची कळशी     २०
 

 

Web Title: Specialty of village lakhs Rs pot selling village Varnul

टॅग्स