गाव माझं वेगळंः घरटी एक माणूस हॉटेल व्यवसायात

सुनील कोंडुसकर
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या बल्लवाचार्यांचा डंका आहे. घरटी किमान एक व्यक्ती हॉटेल व्यवसायात रोजगाराला आहे.

चंदगड तालुक्‍यातील नागवे गावाला भौगोलिक दुर्गमतेने एक नवीन दिशा दिली आहे. शिक्षण सोडून हॉटेलात काम करणाऱ्या तरुणांनी कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. कामगार म्हणून लागला, अनुभव आणि त्या जोरावर स्वतः हॉटेल मालक बनला, असा येथील लोकांचा चढता आलेख आहे. दुबईपर्यंत इथल्या बल्लवाचार्यांचा डंका आहे. घरटी किमान एक व्यक्ती हॉटेल व्यवसायात रोजगाराला आहे.

चंदगडपासून सुमारे दहा किलोमीटर पश्‍चिमेला सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) तालुक्‍याच्या सीमेवरील नागवे किर्रर्र जंगलाने आच्छादलेले. पावसाळ्यात तीन हजार मिलिमीटरहून अधिक कोसळणारा पाऊस. भौतिक सुविधांना महत्त्व आलेल्या काळात इथली भौगोलिक दुर्गमता जणू शापदायकच. आजही गावाला जोडणारा पक्का रस्ता नाही. पाचवी, सातवीपर्यंत गावातील शाळेत शिक्षण पूर्ण झाले, की पुढे तालुक्‍याच्या गावाला  जाण्यासाठी रहदारीची व्यवस्था नाही. आर्थिक कुवत नाही म्हणून अनेकांनी शिक्षणाला रामराम ठोकल्याचे या गावचे पोलिसपाटील नंदकुमार नाडगौडा यांनी सागितले.

पूर्वी अशिक्षित लोक शेतीतच आयुष्यभर राबत असत. शिक्षण गावापर्यंत पोचले आणि शिकलेली मुले नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने गाव सोडू लागली. साधारण १९८७-८८ च्या सुमारास रामचंद्र नाडगौडा, नामदेव चांदीलकर, चंद्रकांत म्हापणकर बारामतीला हॉटेलात कामासाठी गेले. त्यानंतर गावात एक प्रकारचा ‘ट्रेंड’च तयार झाला. दरवर्षी चार-पाच मुले जुन्या कामगारांच्या ओळखीने हॉटेलात कामाला जाऊ लागली. प्रामाणिकपणा आणि कष्टाची तयारी यावर नोकरी मिळत असल्याने अनेकांनी सहजपणे हा मार्ग निवडला. 

 

हातात पैसा खेळू लागल्याने त्यांनी गावाकडे घर, शेती सुधारणेला सुरवात केली. ही मुले विविध सण, उत्सवानिमित्ताने गावाकडे येत. त्यांच्या अंगावरील फॅशनेबल कपडे, पायात शूज, टेप रेकॉर्डर यासारख्या वस्तू बघून इतरांनाही त्यांचा हेवा वाटू लागला. त्यामुळे काहींनी शिक्षण अर्धवट सोडून हॉटेलात ही वाट धरल्याचे निवृत्त पोस्टमास्तर संभाजी नाडगौडा यांनी सांगितले. मात्र हॉटेलातील नोकरीने अनेकांच्या आयुष्याला कलाटणी दिली हेही त्यांनी प्रामाणिकणे कबूल केले. हॉटेलातील नोकरी आणि व्यवसायातून अनेकांनी आपले सामाजिक स्थान निर्माण केले आहे. बंगला, गाडी, स्थावर मालमत्ता यामुळे समाजात त्यांना प्रतिष्ठा मिळाली. 

रामचंद्र इराप्पा नाडगौडा, निवृत्ती आप्पाजी नाडगौडा, नामदेव चांदीलकर, चंद्रकांत म्हापणकर बारामतीला हॉटेल कामगार म्हणून गेले. त्यापैकी बहुतेक जणांनी आता स्वतःची हॉटेल्स सुरू केली आहेत. अनेकजण घर, शेती घेऊन तिकडेच स्थायिक झाले. रामचंद्र नाडगौडा यांनी जावई पप्पू रेडेकर यांच्यासह स्वतःचा हॉटेल व्यवसाय उभारला आहे. त्यांचा मुलगा महेश हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण करून सध्या दुबईत नोकरी करीत आहे. चौथी शिकलेल्या गोविंद नाडगौडा यांनी बेळगाव येथील सत्कार हॉटेलमध्ये कामगार म्हणून कामाला सुरवात केली. तेथून ते पुणे येथील वाडिया कॉलेजच्या कॅन्टिंगमध्ये नोकरीला लागले. सध्या पुण्यात त्यांचा स्वतःचा हॉटेल व्यवसाय आहे. गावातील रवळनाथ मंदिराला त्यांनी दीड लाखांची देणगी दिली आहे. तुकाराम कांबळे यांनी वीस वर्षे दुबई येथे हॉटेलात काम केले. सेवानिवृत्त होऊन ते सध्या गावाकडे आले आहेत. सचिन म्हाडगुत, सागर गुरव यांच्यासह सुमारे ८० जण या व्यवसायात कामगार, मालक म्हणून कार्यरत आहेत. अनेकजण ‘कूक’ म्हणून पारंगत आहेत. 

नाव मिळवले तरी गावाशी संपर्क कायम आहे. विविध सणांनिमित्ताने ते गावात एकत्र येतात. गाव विकासकामांसाठी मदत करतात. शैक्षणिक विकासावर त्यांनी भर दिला आहे. गावातील रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही प्रत्येकजण मनोभावे मदत करीत आहे. सणाच्या निमित्ताने गाव जेवणाची जबाबदारी हे बल्लवाचार्य उचलतात. चार, पाच हजार लोकांसाठी रुचकर जेवण तयार करताना त्यांच्या मनात सेवाभाव असतो.  

हॉटेलमध्ये काम करून शिक्षण, नोकरी....
हॉटेलात काम करून शिक्षण पूर्ण केले आणि नोकरी मिळवल्याची गावात उदाहरणे आहेत. अशोक नाडगौडा यांनी बी.एड. केले. ते सध्या खेडूत शिक्षण मंडळात शिक्षक आहेत. ज्ञानेश्‍वर नाडगौडा यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. सध्या ते खानापूर (जि. बेळगाव) येथे प्रतिथयश डॉक्‍टर म्हणून कार्यरत आहेत.

‘‘परिस्थितीशी संघर्षामुळे आम्ही हॉटेल व्यवसायाकडे वळलो. हॉटेलमध्ये काम मिळवणे सोपे आहे, असा सर्वसामान्य समज आहे; परंतु तशी स्थिती नाही. त्यासाठी खूप संयम हवा. संघर्षामुळेच टिकलो आणि स्थिर स्थावर झालो.’’- 
गोविंद नाडगौडा, हॉटेल व्यावसायिक, पुणे (मूळ गाव नागवे)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: specialty of village one person from family in hotel business in Nagave