#Specialtyofvillage पेरीड गाव तब्‍बल ६६ वर्षे निवडणुकीविना

#Specialtyofvillage पेरीड गाव तब्‍बल ६६ वर्षे निवडणुकीविना

गावोगावच्या ग्रामपंचायती, विकास सेवा संस्था, दूध संस्था यांच्या निवडणुका म्हटलं की गटबाजी, टोकाची ईर्षा, पैशाची उधळण आणि त्यातून ह्याची अडवा अन्‌ त्याची जिरवा, हेच चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते आहे; पण शाहूवाडी तालुक्‍यातील पेरीड गाव मात्र याला अपवाद आहे. ग्रामपंचायत, विकास सेवा संस्था, सहकारी दूध संस्था यांची स्थापनेपासून एखादीही निवडणूक झालेली नाही. सर्व निवडणुका बिनविरोध ही येथील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. गेली ६६ वर्षे एकीच्या जोरावर गावाने ही परंपरा अखंडितपणे जपत इतरांपुढे मोठा आदर्श ठेवला आहे. शेती, उद्योगातही गावाने ठसा उमटवला आहे.

सहयाद्री डोंगररांगेच्या कुशीत व कडवी नदीच्या तीरावर वसलेले सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीच पेरीड. येथे १९५१ मध्ये विकास सेवा संस्थेची, १९५६ मध्ये ग्रामपंचायत व त्यानंतर सहकारी दूध संस्थांची स्थापना झाली. स्थापनेपासून आजपर्यंत एकदाही यापैकी एकाही संस्थेची निवडणूक झालेली नाही.

बिनविरोध निवडी व त्यातून लोकसेवा हे जणू गावाचे ब्रीदच आहे. माजी आमदार व शाहूवाडी पंचायत समितीचे पहिले सभापती राऊ पाटील, पहिले सरपंच लक्ष्मण पाटील, विठ्ठल पाटील, पांडुरंग कुंभार, बापू पाटील, वसंत पाटील, कोंडिबा कांबळे, मोहिते गुरुजी, गणपती पाटील, दादू केसरे अशा ज्येष्ठ लोकांनी बिनविरोध निवड आणि त्याचे महत्त्व गावाला पटवून देत पायंडा पाडला. ग्रामपंचायतीत जागा मिळणे इतपत दलित समाजाची लोकसंख्या गावात नाही. तरीही या समाजाला ग्रामपंचायतीत बिनविरोध प्रतिनिधित्व दिले जाते. 

गावात राजकीय गटतट नाहीत, ईर्षा नाही असे नाही; मात्र गाव हितासाठी सारे एकत्र येतात. बिनविरोध निवडणुका लोकशाही मार्गाने सर्वमान्य तोडग्यानुसार होतात. कोणतीही निवडणूक लागली की इतर गावांप्रमाणे इथेही चर्चा असते; पण ती गटातटाची नसून या वेळी योग्य उमेदवार कोण असावा, याची असते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी आदल्या दिवशी गावबैठक होते. उपस्थित मते मांडतात. त्यावर चर्चा होते. अखेर गाव निर्णय होईल, तो सर्वमान्य असतो. कोणताही निर्णय कोणावरही लादला जात नाही. यातूनच खरी लोकशाही येथे नांदते. ही परंपरा आजही कायम आहे. माजी आमदार राऊ पाटील गाव नेतृत्व करत होते. आता सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावगाडा चालला आहे.

बिनविरोध निवडणुकांबरोबरच सर्व संस्थांचा स्वच्छ व पारदर्शक कारभार ठेवून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या आहेत. विकास सेवा संस्थेकडे सध्या ३८ लाख, ग्रामपंचायतीकडे २७ लाख, दूध संख्यांकडे प्रत्येकी १० ते १४ लाख असा स्व निधी आहे.
येथे ऊस, केळी, रताळ्यांचे विक्रमी उत्पन्न घेतले जाते. बाबूराव सागावकर, गुंगा गाडे, विजय घोलप व मिलिंद पाटील यांनी उद्योग क्षेत्रात धडक मारत अनेकांच्या हाताला काम दिले आहे. सैनिकी सेवेत ७५, पोलिसी सेवेत २५ तर कुस्ती क्षेत्रात ५० वर नामांकित मल्ल आहेत. पोलिस उपअधीक्षक पदावर काम करणाऱ्या बाजीराव पाटील यांना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रतिवर्षी गावच्या यात्रेनिमित्त लाखो रुपयांचे बक्षीस असणाऱ्या कुस्ती मैदानाचे आयोजन ग्रामस्थ करतात. देशभरातून मल्ल येथे येतात. एक गाव एक गणपती संकल्पनाही गावात रुजली आहे.

गावहिताचा गाडा चालवत पेरीड गाव तालुका आणि जिल्हा राजकारणातही सक्रिय आहे. राऊ पाटील १९६२ ला शाहूवाडीचे पहिले सभापती झाले. ते पुढे १९६७ ला आमदार झाले. बापू पाटील, वंदना पाटील पंचायत समिती सदस्य होते. ठाणे महापालिकेत आनंदा केसरे नगरसेवक होते. सध्या दिलीप पाटील मलकापूरचे उपनगराध्यक्ष आहेत. सर्जेराव पाटील जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती व जिल्हा बॅंकेत संचालक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडीची परंपरा पुढे सुरू आहे.

ग्रामपंचायतीसह सर्व संस्थांचा कारभार स्वच्छ आहे. त्यावर ग्रामस्थांचा विश्वास आहे. बिनविरोध निवडणुकांची परंपरा यापुढेही कायम राहण्यासाठी अग्रेसर राहणार.
- सर्जेराव पाटील,
बांधकाम सभापती जिल्हा परिषद 

बिनविरोधची परंपरा चांगली आहे. आमच्या विचाराला लोकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे गावचा विकास झाला. पाणी, रस्ते, शिक्षण अशा प्राथमिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.
-राऊ पाटील,
माजी आमदार

संकल्‍प अत्याधुनिक ग्रामसचिवालयाचा
देशात आदर्श ठरेल असे सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक ग्रामसचिवालय गावच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना एकाच छताखाली सर्व सेवा सुविधा मिळणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com